रत्नागिरी : तालुक्यातील जाकादेवी येथे एका तरुणाचा त्याच्या पत्नीनेच विष देऊन खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पत्नीसह सासू सासऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भानुप्रताप रामनिवास (उत्तरप्रदेश) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर शर्मिला रामविलास असे पत्नीचे नाव आहे. मनीराम कल्लूराम (मयताचे सासरे, ४५, उत्तरप्रदेश), व मयताची सासू अशा तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सततच्या वादातून खून केल्याचे समोर आले आहे. याबाबतची फिर्याद मयत तरुणाचे वडील राम श्रीपाल निवास (वय ४५, रा. बरसोला कला, तिकोनिया, जि. खीरी, उत्तर प्रदेश) यांनी दिली. विशेष म्हणजे, या गुन्ह्याची प्राथमिक तक्रार उत्तर प्रदेशातील तिकोनिया पोलीस ठाण्यात दाखल झाली होती आणि ती ‘झिरो एफआयआर’ म्हणून रत्नागिरी येथे वर्ग करण्यात आली आहे. चार महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेत गुन्ह्यात मृताची पत्नी, सासरे आणि सासू यांच्यासह एकूण तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील खीरी जिल्ह्यातून कामानिमित्त रत्नागिरी येथे आलेल्या भानुप्रताप रामनिवास आपल्या पत्नीसह जाकादेवी येथे होता. मयताचे वडील राम श्रीपाल निवास यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा मुलगा भानुप्रताप रामनिवास भानुप्रताप याचे दोन वर्षांपूर्वी आरोपी शर्मिला हिच्याशी लग्न झाले होते. मात्र, तिची वृत्ती भांडखोर असल्याने ती भानुप्रताप याच्याशी नेहमी भांडत असे. यातील आरोपी क्रमांक २, मनीराम कल्लूराम (वय ४५) याच्या सांगण्यावरून आरोपी शर्मिला हिने भानुप्रतापला २० जून २०२५ रोजी रत्नागिरी येथे आणले होते. मयताच्या वडिलांनी वारंवार मनीराम (मयताचा सासरा) याला फोन करून मुलाबद्दल विचारपूस करण्याचा प्रयत्न केला, परंतु आरोपींनी त्यांच्या मुलाबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. याच दिवशी आरोपी क्रमांक २ मनीराम याने मयताच्या वडिलांना फोन करून त्यांचा मुलगा आजारपणामुळे मरण पावल्याचे कळवले. मात्र, फिर्यादींना संशय आहे की, आरोपी मनीराम, त्याची पत्नी (आरोपी क्र. ३, नाव माहीत नाही, वय ४०) आणि आरोपी क्र. १ (भानुप्रतापची पत्नी) यांनी संगनमत करून भानुप्रताप रामनिवास याला विषारी पदार्थ पाजून ठार मारले आहे.
फिर्यादी राम निवास यांनी २३ जून २०२५ रोजी उत्तर प्रदेशातील तिकोनिया पोलीस ठाणे, जि. खीरी येथे ही तक्रार दाखल केली होती. तिकोनिया पोलिसांनी ही तक्रार ‘झिरो एफआयआर’ म्हणून नोंदवून घेतली आणि पुढील तपासासाठी ती १६ ऑक्टोबर २०२५ रोजी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग केली. ही कागदपत्रे अखेर १९ ऑक्टोबर २०२५ रोजी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांना प्राप्त झाली. या घटनेप्रकरणी भारतीय दंड संहिता कलम ३०२ (खून) आणि १०३(१), ३(५) अन्वये गुन्हा क्र. १९३/२०२५ दाखल करण्यात आला आहे. तिघांनाही पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडून करण्यात येत आहे. भांडणातून हा खून झाल्याचे निष्पन्न झाले असले तरी आखणी काही करणे आहेत याचा तपास पोलिस करत आहे.
सुमारे चार महिन्यांपूर्वी घडलेल्या या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा अधिक तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस करत असून, आरोपी उत्तर प्रदेशात असल्याने पोलिसांना तपासासाठी अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत. या घटनेमुळे स्थानिक वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.
जाकादेवीत खून : नवऱ्याला विष देऊन मारले; पत्नीसह सासू, सासऱ्यावर गुन्हा







