सावर्डे : चिपळूण तालुक्यातील नायशी राक्षेवाडी येथे बांबूचे बेट विकल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीने थेट ८० वर्षांच्या वृद्ध महिलेला शिवीगाळ करत काठीने मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. यात वृद्ध महिला जखमी झाली असून, सावर्डे पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी लक्ष्मी गंगाराम राक्षे (वय ८०, व्यवसाय गृहिणी, रा. नायशी राक्षेवाडी, ता. चिपळूण) यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी शांताराम बाळू राक्षे (रा. नायशी राक्षेवाडी, ता. चिपळूण) याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कायदा २०२३ च्या कलम ११८(१) आणि ३५२ अन्वये गुन्हा (गु.आर.क्र. १०३/२०२५) दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २२ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास नायशी राक्षेवाडी येथील फिर्यादी लक्ष्मी राक्षे यांच्या घराच्या परसात घडली. लक्ष्मी राक्षे या त्यांच्या जमिनीतील बांबूचे बेट तोडण्यासाठी आलेल्या गोसावी नावाच्या व्यापाऱ्याशी बोलत होत्या.
याच दरम्यान, आरोपी शांताराम बाळू राक्षे तिथे आला आणि त्याने लक्ष्मी राक्षे यांना ‘बांबूचे बेट का विकले?’ असे बोलून वाद घालण्यास सुरुवात केली. त्याने लगेच लक्ष्मी राक्षे यांना शिवीगाळ केली आणि त्यानंतर हातात असलेल्या काठीने त्यांच्या खांद्यावर मारहाण केली. यात लक्ष्मी राक्षे यांना दुखापत झाली आहे.
जखमी लक्ष्मी राक्षे यांनी तातडीने सावर्डे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी २२ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ११.३० वाजता गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.






