GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वर: वर्षभराची शेती पावसात भिजली; रेशनसुद्धा मिळत नाही!

Gramin Varta
373 Views

फुणगुस येथील घडशी कुटुंबावर संकट

संगमेश्वर: यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे संगमेश्वर तालुक्यातील अनेक शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत, परंतु फुणगूस गावातील शेतकरी चंद्रकांत तानाजी घडशी यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. शेती हाच एकमेव उपजीविकेचा आधार असलेले हे कुटुंब पावसाच्या अनपेक्षित माऱ्याने आज अत्यंत बिकट परिस्थितीत सापडले आहे.

घडशी कुटुंबातील सात सदस्यांचे पोट पूर्णपणे भातशेतीवर अवलंबून होते. यंदा पीक उत्तम बहरले होते आणि कापणीसाठी पूर्णपणे सज्ज होते. मात्र, निसर्गाच्या या अवकृपेने काही तासांतच होत्याचे नव्हते केले. अतिवृष्टी आणि पाण्यामुळे शेतातील संपूर्ण भातपीक अक्षरशः वाहून गेले, परिणामी घरात अन्नधान्याचा गंभीर तुटवडा निर्माण झाला आहे.

या गंभीर परिस्थितीवर चंद्रकांत घडशी यांनी आपली व्यथा मांडली. आमचं रेशन कार्ड गरीब रेषेच्या वर असल्याने आम्हाला शासनाकडून कोणतेही धान्य मिळत नाही. ही शेतीच आमचं सर्व काही होती, आयुष्याचा आधार होती, पण आता तेच नाहीसं झालं आहे. घरातले सातजण काय खाणार, कसं जगणार?  हा प्रश्न आम्हाला रात्रंदिवस सतावतो आहे. काय करावे हेच कळत नाहीये.

घडशी कुटुंबावर कोसळलेल्या या संकटामुळे स्थानिक नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. स्थानिक प्रशासन आणि शासनाने तातडीने या कुटुंबाला मदतीचा हात देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अतिवृष्टीमुळे त्रस्त झालेल्या आणि आधार गमावलेल्या अशा गरीब व गरजू शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत आणि अन्नधान्याचा पुरवठा करणे ही वर्तमान परिस्थितीत अत्यंत आवश्यक आणि काळाची गरज बनली आहे. प्रशासनाने त्वरित दखल घेऊन या कुटुंबाला आधार द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Total Visitor Counter

3369319
Share This Article