GRAMIN SEARCH BANNER

पाचल येथील तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयाची जुनी इमारत पाडली; नव्या इमारतीच्या कामाला लवकरच सुरुवात

Gramin Varta
212 Views

तुषार पाचलकर / राजापूर
राजापूर तालुक्यातील सुमारे १८ ग्राम महसूल कार्यालये व मंडळ अधिकारी कार्यालये निर्लेखित करण्याबाबत राजापूर तहसीलदार विकास गंबरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता, राजापूर यांना दिनांक ४ डिसेंबर २०२५ रोजी पत्र दिले होते. या पत्राच्या अनुषंगाने मंगळवारी, दि. १७ जानेवारी २०२६ रोजी पाचल येथील अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेली तलाठी कार्यालय व मंडळ अधिकारी कार्यालयाची जुनी व मोडकळीस आलेली इमारत पाडण्यात आली.

पाचल मंडळ अधिकारी कार्यालयांतर्गत पाचल, पेठवाडी, रायपाटण, परुळे व येळवण अशा पाच सजा असून या सजा अंतर्गत एकूण १५ गावे येतात. सदर ठिकाणी नवीन व सुसज्ज इमारत उभारण्याच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात आली असून, लवकरच नूतनीकरण व नव्या बांधकामाचे काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग, राजापूर कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

नवीन प्रस्तावित इमारतीत पाचल व पेठवाडी येथील दोन तलाठी कार्यालये तसेच पाचल मंडळ अधिकारी कार्यालय असे एकूण तीन कार्यालये उभारण्याचा विचार महसूल विभागाकडून करण्यात आला आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी सदर इमारत धोकादायक ठरल्याने तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयांचे कामकाज पाचल ग्रामपंचायत इमारतीत तात्पुरत्या स्वरूपात सुरू होते.

राजापूर तालुक्यात एकूण ६३ तलाठी कार्यालये व १० मंडळ अधिकारी कार्यालये बांधण्यात येणार असून, त्या कामाची सुरुवात पाचल येथील कार्यालयापासून करण्यात आली आहे. आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या प्रयत्नातून अर्थसंकल्पात मंजूर झालेल्या या इमारतीचे भूमिपूजन नुकतेच युवा नेत्या अपूर्वाताई सामंत यांच्या उपस्थितीत पार पडले होते.

Total Visitor Counter

3387074
Share This Article