GRAMIN SEARCH BANNER

दापोली-मंडणगड मार्गावर ‘हास्यजत्रा’ फेम निखिल बनेच्या बाईकचा अपघात; कोकणी माणुसकीचे दर्शन घडवत स्थानिकांकडून तातडीने मदत

Gramin Varta
195 Views

रत्नागिरी: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता निखिल बने याच्या बाईकला कोकण दौऱ्यावर असताना दापोली-मंडणगड परिसरात अपघात झाला. सुदैवाने या अपघातात निखिलला मोठी इजा झाली नसून त्याच्या हाताला आणि पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. आपल्या ‘कोको राईड’ या युट्यूब व्लॉग सीरिजच्या चित्रीकरणासाठी निखिल सध्या कोकणातील किनारपट्टीच्या भागातून बाईक प्रवास करत असताना ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, निखिल बने मंडणगड-दापोली परिसरातील हिंमतगडाकडे जात असताना एका गावातील तीव्र चढावावर हा अपघात झाला. रस्ता घसरडा असल्याने त्याचे बाईकवरील नियंत्रण सुटले आणि तो गाडीसह खाली पडला. अपघात घडताच आजूबाजूच्या स्थानिक नागरिकांनी क्षणाचाही विलंब न लावता मदतीसाठी धाव घेतली. रस्त्यावर खारी-बटर विकणाऱ्या एका विक्रेत्याने त्याला तातडीने सावरून उभे केले, तर गावातील महिलांनी पाण्याची सोय करत त्याची विचारपूस केली. स्थानिकांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे आणि प्रेमामुळे निखिल भावूक झाला असून त्याने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत या घटनेची माहिती दिली.

निखिलने आपल्या व्हिडिओमध्ये कोकणातील माणुसकीचे गोडवे गात मदतीला धावलेल्या अज्ञात व्यक्तींचे आभार मानले आहेत. “मला मदत करणाऱ्यांची नावे माहित नाहीत, पण त्यांचे चेहरे मी कधीच विसरणार नाही,” अशा शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांनी काळजी व्यक्त केली असून, त्याला पुढील प्रवासासाठी सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. या प्रसंगाने कोकणची निसर्गसंपदा जितकी सुंदर आहे, तितकीच इथली माणसेही प्रेमळ आहेत, याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

Total Visitor Counter

3209272
Share This Article