रत्नागिरी : निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेला प्रदेश म्हणजे कोकण. हिरवाईनं नटलेलं हे नंदनवन थंडीच्या दिवसांत आणखीनच खुलतं. सध्या कोकणात हुडहुडी भरवणाऱ्या थंडीची चाहूल लागली असून, घाटमाथ्यावर दाट धुक्याची चादर पसरली आहे. यावर्षी थोडा उशिरा का होईना, पण नोव्हेंबरच्या सुरुवातीपासूनच कोकणात गुलाबी थंडीची चाहूल लागल्याने निसर्गाचं सौंदर्य खुलून आलं आहे.
रत्नागिरीजवळील निवळी घाट हा सध्या निसर्गप्रेमींसाठी खास आकर्षण ठरत आहे. सकाळी दहा वाजेपर्यंत या घाटावर धुक्याची चादर कायम असल्याने दृश्य नयनरम्य दिसते. वळणावळणाच्या घाटरस्त्यांतून धुक्यात हरवलेले डोंगर आणि त्यातून मार्ग काढत जाणारी वाहने हा अनुभव पर्यटकांना मंत्रमुग्ध करणारा ठरतो.
गेल्या काही दिवसांपासून तापमानात घट झाल्याने बोचऱ्या थंडीनं कोकणात हजेरी लावली आहे. निवळी परिसरात बावनदीजवळील पाणथळ भागांमुळे धुकं अधिक प्रमाणात जाणवतं. त्यामुळेच अनेक बाईक रायडर्स आणि निसर्गप्रेमी या घाटात धुक्यात हरवलेलं सौंदर्य अनुभवण्यासाठी येत आहेत. दाट धुक्यातून वाट काढत जाणारी ‘लाल परी’ सुद्धा पर्यटकांसाठी एक वेगळं आकर्षण ठरते.
या दिवसांत कोकणातले घाट रस्ते, डोंगरमाथ्यावरील हिरवाई आणि धुक्यात लपाछपी खेळणारे निसर्ग दृश्य प्रत्येक प्रवाशाला थांबवून ठेवतात. थंड वाऱ्याची झुळूक आणि डोंगरमाथ्यावर पसरणारं दाट धुकं निसर्गाच्या या अनोख्या रूपानं कोकणाचा प्रत्येक कोपरा स्वर्गसदृश भासतो.
थोडक्यात, कोकणात सध्या थंडी आणि धुक्याचा मिलाफ पाहायला मिळत असून, या सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांची पावलं पुन्हा कोकणाच्या दिशेने वळली आहेत.
कोकणात थंडीची चाहूल, घाटरस्त्यांवर दाट धुक्याची चादर





