वैभव पवार / गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील मुख्य बाजारपेठेपासून धावडेवाडीकडे जाणारा रस्ता हा तीव्र चढउताराचा आणि रहदारीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, या रस्त्याची स्थिती गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत दयनीय झाली होती. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते तसेच अलीकडच्या अवकाळी पावसामुळे खडी व मातीचे थर साचून रहदारीला अडथळा निर्माण झाला होता. या ठिकाणी काही दिवसांपूर्वी दुचाकीस्वार घसरल्याची किरकोळ अपघाताचीही घटना घडली होती.
या पार्श्वभूमीवर मालगुंड येथील रिक्षाचालक संघटनेने सामाजिक बांधिलकीतून पुढाकार घेत श्रमदान उपक्रम राबविला. बाजारपेठ ते धावडेवाडी या रस्त्यावरील माती, खडी काढून रस्त्याची समतोल डागडुजी करण्यात आली. परिणामी रस्त्याचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलला असून आता हा रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित व सोयीस्कर झाला आहे.
रस्त्याच्या डागडुजीचे काम हे स्थानिक प्रशासन किंवा ग्रामपंचायतीकडून व्हायला हवे होते, परंतु प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने रिक्षाचालक संघटनेने स्वतःहून पुढाकार घेऊन हा उपक्रम राबविला. या सामाजिक कार्याबद्दल धावडेवाडी आणि मालगुंड परिसरातील नागरिकांनी रिक्षाचालक संघटनेचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
या श्रमदान उपक्रमामुळे रिक्षाचालक संघटनेने ‘सेवा हाच धर्म’ हा संदेश देत समाजासमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे. मालगुंड परिसरात त्यांच्या या पुढाकाराचे विशेष कौतुक होत आहे.
मालगुंड रिक्षाचालक संघटनेचा आदर्श उपक्रम! बाजारपेठ ते धावडेवाडी रस्त्याची श्रमदानातून डागडुजी







