तुषार पाचलकर / राजापूर : माझ्या पत्नीला भूताने उचलून नेले असा कांगावा करून तो मी नव्हेच असे भासवणाऱ्या पतीने स्वतःच पत्नीचा खून केल्याचे पुराव्यात उघड झाल्यानंतर त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. परिस्थितीजन्य पुराव्यांवर विश्वास ठेवत न्यायालयाने गजानन जगन्नाथ भोवड (रा. परुळे, सुतारवाडी, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) याला दोषी ठरवले.
परुळे, सुतारवाडी येथील रहिवासी असलेल्या गजानन भोवड याने २५ सप्टेंबर २०२१ रोजी आपली पत्नी सिद्धी ऊर्फ विद्या गजानन भोवड हिची हत्या केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. पत्नी वेळेवर जेवण देत नाही, मुलांकडे व्यवस्थित लक्ष देत नाही आणि आई-वडिलांवरून शिवीगाळ करून भांडण करते, या क्षुल्लक कारणांवरून आरोपीने हे क्रूर कृत्य केल्याचे उघड झाले आहे. आरोपी गजाननने २५ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी २.०० वाजण्याच्या सुमारास पत्नी सिद्धीला ‘तुला तुझ्या बहिणीकडे घेऊन जातो’ असे सांगून परुळे, सुतारवाडी येथील जंगलमय ठिकाणी नेले. या गवताळ आणि दलदलीच्या भागात आरोपीने तिचे नाक आणि तोंड हाताने दाबून तिला जीवे ठार मारले आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह तेथील गवतात उपड्या स्थितीत लपवून ठेवला. यानंतर आरोपीने पोलिसांना पत्नीच्या मरणाबाबत खोटी खबर दिली होती.
याप्रकरणी आरोपी गजानन जगन्नाथ भोवड याच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम ३०२ (खून), २०१ (पुरावा नष्ट करणे) आणि १७७ (खोटी माहिती देणे) नुसार दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. सरकारी पक्षाने गुन्हा सिद्ध करण्यासाठी एकूण १४ साक्षीदार तपासले, पण आरोपीची बहीण, मेहुणा आणि सरपंच असे महत्त्वाचे साक्षीदार फितूर झाले. मात्र, या खटल्यात परिस्थितीजन्य पुरावे महत्त्वाचे ठरले. डॉ. अजित गणपत पाटील, डॉ. विनोद चव्हाण, पंच सतीश शिंदे आणि मयत सिद्धीची बहीण सोनाली शिंदे यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. सत्र न्यायाधीश ओ. एम. आंबाळकर यांच्या कोर्टात महिनाभर दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद चालला. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतानाही, परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे.
न्यायालयाने आरोपीला भा.दं.वि. कलम ३०२ (खून) साठी जन्मठेप आणि ५,०००/- रुपये दंड, भा.दं.वि. कलम २०१ (पुरावा नष्ट करणे) साठी तीन वर्षांची शिक्षा आणि १,०००/- रुपये दंड, आणि भा.दं.वि. कलम १७७ (खोटी खबर) साठी एक वर्षाची शिक्षा आणि ५००/- रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. दंडापैकी ५,०००/- रुपयांची रक्कम फिर्यादीच्या आईला देण्याचे आदेश दिले आहेत. या केसमध्ये अति. सरकारी वकील ॲड. प्रफुल्ल रामचंद्र साळवी यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. तपासिक अंमलदार परबकर, पोलीस निरीक्षक यांनी या गुन्ह्याचा तपास केला होता.
राजापूर : स्वतः पत्नीचा खून करून भूताने उचलून नेल्याचा बनाव करणाऱ्या पतीला जन्मठेप






