GRAMIN SEARCH BANNER

भाताच्या उडव्या रचणे हे एक कलात्मक काम

Gramin Varta
13 Views

रायगड : बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर सर्वच ठिकाणी दिसून येत आहे. माणूस चंद्रावर जावू लागला ही बाब आनंद दायक असली तरी या तंत्रज्ञानाचा वाढत्या प्रभावामुळे आजची तरुण पिढी मोबाईच्या जमान्यात हरवत चालली असून ग्रामीण भागातील शेतीची विविध कामे पासून शेतकऱ्यांची मुलेबाळे दूर होत चालली आहेअसे वास्तव समोर आले आहे.

शेतीमध्ये बदल होत आहेत. सर्वत्र तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. मात्र आजही काही ठिकाणी कंपनी झोडणी हातानी करण्यात येत आहे. यामध्ये ग्रामीण भागात भात अडगवणे म्हणजे भाऱ्या रचण्याचे काम ज्येष्ठ शेतकरी करत आहेत या कामात तरुणवर्ग क्वचित दिसत असल्याने ही शेतीतील कला लोप पावते का आशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

कोकणातील शेतकरी आंबा, काजू, सुपारी नारळ या बरोबरच भात पिकांचा राजा म्हणून ओळखला जातो.परंतु गावागावात भातपिकाचे एकमेव पिक घेतलं जातं..मग सर्वजण एकत्र येत शेतीच्या प्रत्येक कामात मदत कर पण ती मदत एक वेगळीच मज्जा देऊन जायची.. ज्याची आठवण आजही कायम आहे.

यामध्ये शेत तयार करणे, (कौल करणे, गवत कापणे, तरव्याला माती लावणे, तरवे पेटवणे) साकळणे, बी पेरणी, नांगरणी भात लावणी, बेनणी, खुरपणी, भात कापणी इ कामानंतर सुरू होते भात अडगवणे…! कापून सुकलेली भात काडी एकत्र करून भारा तयार करणं,मग भारे पेंढ्यांच्या ऐठाने करकचून बांधून डोक्यावर दिले जात आणि मग ही मग ते भारे शेतात असलेल्या उडव्याच्या (भारा रचण्याचे ठिकाण) बाजुला नेऊन ठेवत| उडवं तयार करत असत त्यांची रुबाबदार लकब,भारे रचण्याची पद्धती, गोलाकार, चौकोनी आकाराचे, घुमटासारखे सुंदर व देखणं भाताचे उडवं म्हणजे आजचा सर्वात उंच आयफेल टॉवर आहे असा भास, त्यावेळी लहान बच्चे कंपनीला शेतात काम करताना होत असे तसाच आनंद प्रत्येक शेतकऱ्याचा असायचा…मग भात मळणी,भात संग्रह ही कामे करत असत मात्र आजची तरुण पिढी शिक्षण व्यवस्थेत पुढे आहे.

तंत्रज्ञान चा पुरेपूर वापर करत आहे. यामुळे शेतीच्या कामात विविध मशीनचा पुरेपूर वापर करत शारीरिक कामापासून मुक्त होत आहे असे असले तरी काही ठिकाणी आजही गरीब शेतकरी आपल्या सहकार्यांना सोबत घेत उडवं तयार करत आहेत भारे उचलत आहेत. यावेळी काही बुजुर्ग शेतकऱ्यांनी सांगितले की आमच्या लहानपणी उडव करताना भारे उचलताना त्यात असणारे सुरवंट दिसले की खाज उठेल म्हणून जीव घाबरत असे…पण भारा मात्र पटापट न्यायचा थांबत नसे….भारा घेऊन चालताना लहान भावंडांमध्ये कोणतेही बक्षीस नसणारी शर्यत लागायची,चालताना कापलेला चोथा पायाच्या बोटांची नार,अगुंस्तानला चीर जायची पण त्या वेदनादायी जखमेने कधी कोणाची त्या कामाची गोडी कमी केली नाही.

उडवे रचणारे त्या कामाचे एक प्रकारे इंजिनिअर होते की कोणास ठाऊक… अनुभवातूनच भार रचताना त्याचा आकार,त्याची रचना,भार लावण्याची ती वैशिष्ट्‌‍यपुर्ण पध्दत,ऐंगा(लहान भारे) वरच्या बाजूला, मंदिराचा घुमटाप्रमाणे त्याची ठेवण,अचानक येणाऱ्या पावसापासून हाताशी आलेल्या भात पिकाचे रक्षण करण्यासाठी खुप काळजीपूर्वक व अभ्यासु उडवं तयार केले जायचे.मात्र आता सर्व बदलले आहे नवनवीन तंत्र विकसित झाल्या पासून फक्त यंत्र व्यवस्थित चालते की नाही हे पहायचे एवढं काम राहिले आहे.

आठवणी डोळ्यासमोर

पूर्वी शेताच्या बांधावरील झाडावर असलेलं सुगरणीच ते टुमदार घरटं, शेतीमध्ये सर्वत्र विखुरलेल्या भाताच्या लोंबा गोळा करताना वयोवृद्ध आजी, ते शेत म्हणजे कसं मोकळे मैदान दिसायचं , ते सर्वत्र उडंगणे,बागडणे,उडव्यावर भारे चढविताना इमारतीच्या पायऱ्यांचा तो आभास, उडव्याकरीता केलेली ती माचळी हे सर्व अनुभवत भात अडगवणी झाल्यावर नदीवर पोहायला जात असत त्याचप्रमाणे कामाला आलेल्या सर्वांनी एकत्र बसून जेवण करणं,हसतखेळत कधी शेतीकामात लहानांकडून एवढं मोठं काम व्हायचे याच कौतुक मात्र सर्वांना असायचं…..आज भारांचे उडवं पाहताना सर्व आठवणी डोळ्यासमोरआल्या…खरंच किती सुंदर दिवस होते ते…. मोबाईलच्या युगात आज लहान मुलांना खरंच ही मज्जार,हा आनंद,हे अनुभव मिळेल का…? यांचीच खंत…बुजुर्ग शेतकरी करत आहेत.

Total Visitor Counter

3072890
Share This Article