GRAMIN SEARCH BANNER

मत्स्यगंधा एक्स्प्रेसमध्ये दागिने चोरी करणारे चारजण ताब्यात; ५० लाखांचे दागिने जप्त

Gramin Varta
353 Views

खेड :  कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांमध्ये होत असलेल्या दागिने चोरी प्रकरणाचा मोठा उलगडा करत रेल्वे संरक्षण दलाने (RPF) चार संशयितांना मडगाव येथे शिताफीने पकडले. अटकेतील चौघांकडून तब्बल ५० लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, ३४,५०० रुपयांची रोकड आणि चार मोबाईल जप्त करण्यात आले. या अटकेमुळे आणखी काही चोरीप्रकरणांचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आरपीएफच्या या सतर्क कारवाईचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

दक्षिण रेल्वेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार हे संशयित मत्स्यगंधा एक्सप्रेसमधून सुरतहून मडगावच्या दिशेने प्रवास करत होते. माहिती मिळताच दक्षिण रेल्वेचे आयजी-कम-पीसीएससी अरुल ज्योती यांनी कोकण रेल्वेचे आयजी-कम-पीसीएससी अभिषेक कुमार आणि मुख्यालयातील एएससी/सी अँड आय जुबैर खान पठाण यांना तातडीने सूचित केले.

संशयितांचे फोटो आणि सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर एक विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकातील काही सदस्यांनी टीटीईचा गणवेश परिधान केला, तर काहींनी फेरीवाला किंवा सामान्य प्रवासी म्हणून रूप धारण केले. हे पथक मत्स्यगंधा एक्स्प्रेसच्या पुढील आणि मागील जनरल डब्यांमध्ये सापळा रचून बसले होते.

मडगाव स्थानकात गाडी पोहोचताच पथकाने चारही संशयितांना कोणतीही दगदग न होता ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता चोरीतील दागिने, रोकड आणि मोबाईल आढळले. अटकेनंतर चौघांना पुढील चौकशीसाठी दक्षिण रेल्वेच्या आरपीएफ एमएक्यूकडे सोपवण्यात आले.

Total Visitor Counter

3366895
Share This Article