मुंबई/ उदय दणदणे : कोकणातील लोककला आणि शाहिरी परंपरा जपण्यासाठी गेल्या ६५ वर्षांपासून अविरत कार्यरत असलेल्या ‘कलगी तुरा समाज उन्नती मंडळ मुंबई’ या संस्थेच्या वतीने मुंबईत प्रथमच एका भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कोकणच्या मातीतील अस्सल कलाप्रकार असलेल्या जाखडी नृत्याचा थरार अनुभवण्यासाठी ‘गौरी गणेश नृत्य स्पर्धा-२०२५’ आयोजित करण्यात आली असून, या सोहळ्यात ज्येष्ठ आणि युवा शाहिरांचा गुणगौरव देखील करण्यात येणार आहे. रविवार, दिनांक ०७ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत मिरारोड (पूर्व) येथील दहिसर चेक नाक्याजवळील भारतरत्न स्व. लता मंगेशकर नाट्यगृहात हा सोहळा रंगणार आहे.
या भव्यदिव्य कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विभंग फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (युवक महाराष्ट्र प्रदेश) उपाध्यक्ष सुशांत गणेश जाबरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कलगी तुरा लोककला संवर्धनासाठी अग्रगण्य असलेल्या या संस्थेने मुंबई उपनगरात प्रथमच अशा मोठ्या स्वरूपाच्या स्पर्धेचे आयोजन केल्याने कलाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांमधून विजेत्यांना रोख बक्षिसे आणि सन्मानचिन्हे देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना ११,००० रुपये, द्वितीय क्रमांकास ७,००० रुपये आणि तृतीय क्रमांकास ५,००० रुपये, तसेच आकर्षक स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येईल. याव्यतिरिक्त वैयक्तिक नैपुण्याला प्रोत्साहन देण्यासाठी उत्कृष्ट गायक आणि उत्कृष्ट ढोलकीपटू यांनाही विशेष बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. उत्कृष्ट गायकास ‘कराओके माईक’ तर उत्कृष्ट ढोलकीपटूस ‘ढोलकी’ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले जाणार आहे.
केवळ नृत्य स्पर्धाच नव्हे, तर या कार्यक्रमात सामाजिक आणि सांस्कृतिक बांधीलकी जपणारे विविध उपक्रमही पार पडणार आहेत. कार्यक्रमाच्या दिवशी ‘कलगी तुरा दिनदर्शिका-२०२६’ चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल. तसेच लोककलेचा वारसा पुढे नेणाऱ्या वरिष्ठ आणि युवा शाहिरांचा विशेष गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यासोबतच राज्याच्या सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘कलगी तुरा पुरस्कार-२०२५’ ने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे सरचिटणीस संतोष धारशे यांनी दिली आहे.
मुंबई उपनगरात प्रथमच कलगी तुरा समाज उन्नती मंडळातर्फे गौरी गणेश नृत्य स्पर्धेचे आयोजन होत असल्याने या कार्यक्रमाला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. हा सोहळा यशस्वी आणि भव्यदिव्य करण्यासाठी संस्थेचे सर्व मुख्य पदाधिकारी आणि सदस्य सध्या जोमाने तयारीला लागले आहेत. कोकणच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारा हा कार्यक्रम मुंबईकरांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे.
मिरारोड येथे रंगणार जाखडी नृत्याचा थरार; कलगी तुरा मंडळातर्फे भव्य स्पर्धेचे आणि गुणगौरव सोहळ्याचे आयोजन






