GRAMIN SEARCH BANNER

आता हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा, कोकणवासियांची चिंता वाढली

Gramin Varta
355 Views

रत्नागिरी देवगड हापूसला कुणीही बाजूला करू शकत नाही : सामंत

रत्नागिरी : भारतीयांच्याच नव्हे तर जगभरातील खवय्याना हापूसची गोडी लागली आहे. पण याच कोकण हापूसवर आता गुजरातनं दावा केला आहे. गुजरातनं वलसाड हापूस म्हणून भौगोलिक मानांकनाची मागणी केली आहे. त्यामुळे कोकणातील आंबा बागायतदारांची सध्या चिंता वाढली आहे.

२०१८ मध्ये मिळालेल्या मानांकनामुळे कोकण हापूसला सुरक्षित बाजारपेठ मिळाली असतानाच नवीन दाव्यांमुळे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, हापूस आंब्यावरही गुजरातनं दावा केल्यामुळे मंत्री उदय सामंत यांनी चांगलंच सुनावलंय.

मंत्री उदय सामंत म्हणाले की, वलसाडचा येऊ दे किंवा कर्नाटकचा येऊ देत फरक पडत नाही. रत्नागिरी देवगडच्या हापूसला कुणीही बाजूला करू शकत नाही. एखाद्या वाक्यावरनं किंवा एखाद्या वलसाड या नावाच्या आंब्यावरन तुम्हाला असं वाटतं का? देवगड हापूसची चव बाजूला होईल किंवा रत्नागिरी हापूसची चव बाजूला होईल. शेवटी आमची चव जी आहे, मधुर चव जी आहे ती तशीच राहणार आहे. आमच्या हापूस आंब्याला, रत्नागिरी हापूसला किंवा देवगड हापूसला कोणीही बाजूला करू शकत नाही हे जगानं सिद्ध केलेलं आहे.

कोकण हापूसला मानांकन मिळाल्यानंतर २०२२ मध्ये शिवनेरी हापूस आंबा नावानं भौगोलिक मानांकनासाठी नारायणगाव कृषी विज्ञान केंद्रानं अर्ज केला होता. त्यानंतर २०२३ मध्ये गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठानं वलसाड हापूस नावानं भौगोलिक मानांकनासाठी अर्ज केला. त्यावर ३० ऑक्टोबरला पहिली सुनावणी झाली.

वलसाड हापूस मानांकनाच्या अर्जाला कोकण आंबा उत्पादक आणि विक्रेते संघटनेनं कडाडून विरोध केला. या संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर विवेक भिडे यांनी म्हटलं की, कोकण हापूससाठी क्युआर कोड तयार केलाय. तरीही कोकण हापूसमध्ये भेसळ होते. आता वलसाड हापूसला मानांकन मिळाल्यास कोकणातील शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होईल.

डॉक्टर विवेक भिडे म्हणाले की, आफ्रिकेतील मलावी देशातून येणाऱ्या मलावी हापूस नावावरही आम्ही आक्षेप घेतला. त्यानंतर मलावी आंबा नावानं विक्री होतेय. कोकण हापूस हे कोकणातल्या चार जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या विशिष्ट आंब्यासाठीच आहे. ते आमच्यासाठीच राहिलं पाहिजे. शिवनेरी हापूस, वलसाड हापूस आणि भविष्यातही असे अर्ज दाखल होण्याची शक्यता असलेल्या हापूसला आमचा विरोध असेल.

Total Visitor Counter

3199426
Share This Article