GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ३१.२१ कोटी जमा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’च्या आठव्या हप्त्याचे वितरण

Gramin Varta
70 Views

मुंबई: राज्यातील बळीराजाला आर्थिक बळ देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. मुंबईतील विधान भवन येथे पार पडलेल्या या विशेष सोहळ्यात राज्यातील ८९ लाख ७५ हजार २९८ शेतकरी कुटुंबांच्या खात्यावर एकूण १७९८.७८ कोटी रुपये थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (डीबीटी) जमा करण्यात आले आहेत. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ३१.२१ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असून, यामुळे कोकणातील बागायतदार आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या वितरण समारंभाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्यासह कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शासनाने २४ मार्च २०२६ अखेरपर्यंत या योजनेच्या पहिल्या सात हप्त्यांमध्ये एकूण १३०१७.३० कोटी रुपये ९३.०८ लाख शेतकरी कुटुंबांच्या खात्यावर यशस्वीपणे जमा केले आहेत. आता आठव्या हप्त्याच्या रूपाने पुन्हा एकदा मोठी आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या पदरात पडली आहे.

जिल्हानिहाय वितरणाचा विचार करता, अहिल्यानगर जिल्ह्याला सर्वाधिक १०८.३० कोटी रुपये मिळाले असून, सोलापूरला ९७.५२ कोटी, कोल्हापूरला ९२.३३ कोटी आणि सातारा जिल्ह्याला ८७.०७ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. कोकण विभागातील रायगडसाठी २२.७९ कोटी, सिंधुदुर्गसाठी २३.५३ कोटी आणि ठाणे जिल्ह्यासाठी १४.१८ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. थेट बँक खात्यात पैसे जमा झाल्यामुळे मध्यस्थांची साखळी मोडीत निघाली असून, पारदर्शक पद्धतीने ही रक्कम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. शेती कामांसाठी ऐन गरजेच्या वेळी हा निधी उपलब्ध झाल्याने राज्यातील शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

Total Visitor Counter

3208521
Share This Article