GRAMIN SEARCH BANNER

वाटद – खंडाळा तिहेरी खून प्रकरण: आंबा घाटात सापडली हाडे, राकेश जंगम खुनाचा होणार उलगडा?

Gramin Varta
53 Views

रत्नागिरी : जिल्ह्यातील बहुचर्चित वाटद–खंडाळा खून प्रकरणाच्या तपासात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. मृत राकेश जंगम याच्या मृतदेहाचा शोध आंबा घाट परिसरात घेत असताना काही हाडे आढळून आली आहेत. ही हाडे राकेश जंगम याचीच असावीत, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. सदर हाडे तपासणीसाठी न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आली असून सीए अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याबाबतची सत्यता स्पष्ट होणार आहे. ही हाडे राकेश जंगम याचीच असल्याचे निष्पन्न झाल्यास तपासकामात पोलिसांना मोठे यश मिळणार आहे.

शहरालगतच्या मिरजोळे येथील भक्ती मयेकर हिच्या खून प्रकरणात आरोपी दुर्वास पाटील याने सीताराम लक्ष्मण वीर (वय ५५, रा. कळझोंडी, रत्नागिरी) व राकेश अशोक जंगम (वय २८, रा. वाटद–खंडाळा, रत्नागिरी) या दोघांचा खून केल्याची कबुली दिली होती. दुर्वासने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार सीताराम वीर हे दुर्वासची मेहुणी भक्ती मयेकर हिच्याशी फोनवर अश्लील संभाषण करत असत. २९ एप्रिल २०२४ रोजी सीताराम हे दुर्वासच्या सायली बार येथे दारू पिण्यासाठी आले होते. त्यावेळी दुर्वास पाटील, विश्वास पवार व राकेश जंगम या तिघांनी सीताराम यांना मारहाण केली. या मारहाणीत सीताराम यांचा मृत्यू झाला.

या खून प्रकरणातील आरोपी राकेश जंगम याला दारूचे व्यसन होते. राकेश खुनाची वाच्यता करेल, अशी भीती दुर्वास पाटील याच्या मनात होती. या भीतीतूनच दुर्वासने राकेशचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. ६ जून २०२४ रोजी दुर्वासने राकेशला कोल्हापूर येथे जायचे असल्याचे सांगितले. कारमधून कोल्हापूरकडे जात असताना दुर्वास पाटील, विश्वास पवार व सांगली येथील निलेश भिंगारडे यांनी कारमध्येच राकेशचा गळा आवळून खून केला. त्यानंतर राकेशचा मृतदेह आंबा घाटात फेकून देण्यात आला.

दरम्यान, राकेश घरी परतला नसल्याने त्याची आई वंदना जंगम यांनी २१ जून २०२४ रोजी जयगड पोलीस स्थानकात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र, या बेपत्ता प्रकरणात जयगड पोलिसांना राकेशबाबत कोणताही सुगावा लागला नव्हता. त्यामुळे वर्षभर सीताराम वीर व राकेश जंगम यांच्या खूनाचा उलगडा होऊ शकला नव्हता.

भक्ती मयेकर हिचा मृतदेह ज्या आंबा घाट परिसरात टाकण्यात आला होता, त्याच ठिकाणी वर्षभरापूर्वी दुर्वासने साथीदारांच्या मदतीने राकेशचा मृतदेह फेकून दिल्याचे तपासात उघड झाले आहे. भक्तीचा मृतदेह पोलिसांना आढळून आला होता, मात्र राकेशच्या मृतदेहाचा कोणताही मागोवा लागला नव्हता. अखेर पोलिसांनी कसून शोध घेतला असता काही हाडे आढळून आली आहेत. ही हाडे नेमकी कोणाची आहेत, याबाबत सध्या पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

Total Visitor Counter

3377022
Share This Article