GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीत कोकण नगर येते गाडी बाजूला करण्यावरून तिघांकडून तरुणाला बेदम मारहाण

Gramin Varta
512 Views

रत्नागिरी : शहरालगतच्या कोकण नगर येथील ग्रीनपार्क परिसरात घराचे बांधकाम सुरू असताना साहित्य नेण्यासाठी कार बाजूला करण्याच्या क्षुल्लक कारणावरून एका तरुणाला दगड आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना १७ डिसेंबर रोजी सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी एका महिलेसह तिघांवर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी अब्दुल मतीन हसनमिया डोंगरकर (वय ३८, रा. एस. कोकण नगर, ग्रीनपार्क, रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी डोंगरकर यांच्या घराशेजारी संशयित आरोपींच्या घराचे काम सुरू आहे. १७ डिसेंबर रोजी सकाळी फिर्यादी हे आपल्या घराबाहेर पायरीवर चहा पित बसले होते. त्यावेळी संशयित आरोपी शैनाज समीर सोलकर, समीर सोलकर आणि साहील समीर सोलकर (सर्व रा. शेटयेनगर, रत्नागिरी) हे त्या ठिकाणी आले. त्यांनी फिर्यादीला ‘आमच्या घराचे बांधकाम करण्यासाठी साहित्य येणार असून तुझी कार बाजूला कर,’ असे सांगितले. त्यावर फिर्यादी डोंगरकर यांनी आपली गाडी बाजूलाच असल्याचे सांगितले.

या गोष्टीचा राग आल्याने संशयित साहील सोलकर याने तेथील दगड उचलून गाडी फोडण्याची धमकी दिली. तसेच शैनाज सोलकर हिने देखील हातात दगड उचलला, तर समीर सोलकर याने लाकडी दांडका हातात घेऊन गाडी फोडण्याची भीती घातली. वाद वाढत गेल्यानंतर संशयित शैनाज व साहील यांनी हातातील दगड फिर्यादीच्या कमरेवर फेकून मारले. फिर्यादीने याचा जाब विचारला असता, समीर सोलकर याने हातातील लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या डाव्या हातावर फटका मारला. तसेच शैनाज हिनेही लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादी अब्दुल डोंगरकर यांच्या हाताला व कमरेला दुखापत झाली असून, संशयितांनी त्यांना शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

या घटनेनंतर जखमी अवस्थेत फिर्यादी डोंगरकर यांना त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिथे दिलेल्या जबाबावरून रत्नागिरी शहर पोलिसांनी तिन्ही संशयितांविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ११८ (१), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

3387353
Share This Article