GRAMIN SEARCH BANNER

ब्रेकिंग: चिपळूण तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का

Gramin Varta
195 Views

येगाव केंद्रबिंदू असलेल्या धक्क्याने नागरिकांची उडाली धावपळ

चिपळूण: रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात बुधवारी दुपारी भूकंपाचा सौम्य धक्का बसल्याने खळबळ उडाली आहे. दुपारी २ वाजून १७ मिनिटांनी बसलेल्या या धक्क्याची तीव्रता रिश्टर स्केलवर २.७ इतकी मोजली गेली असून, चिपळूण तालुक्यातील येगाव हे या भूकंपाचे केंद्रबिंदू असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी अचानक जमिनीतून गुढ आवाज आल्याने आणि सौम्य हादरा बसल्याने येगावसह आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. अनेक नागरिक घराबाहेर सुरक्षित स्थळी धावत आले. भूकंपाचा हा धक्का अत्यंत सौम्य स्वरूपाचा असल्याने सुदैवाने कोठेही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, कोयना आणि आसपासच्या परिसरात वारंवार होणाऱ्या भूगर्भातील हालचालींच्या पार्श्वभूमीवर चिपळूणमध्ये बसलेला हा धक्का नागरिकांच्या चिंतेत भर घालणारा ठरला आहे.

या घटनेची माहिती मिळताच महसूल प्रशासनाने स्थानिक पातळीवर सतर्कतेचा इशारा दिला आहे. भूगर्भशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २.७ रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के हे कमी तीव्रतेचे असतात, त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही, मात्र नागरिकांनी सावध राहावे. येगाव आणि नजीकच्या गावांमधील घरांना कुठे तडे गेले आहेत का, याची पाहणी स्थानिक प्रशासनाकडून केली जात असून सध्या सर्वत्र परिस्थिती सामान्य आहे. अचानक बसलेल्या या धक्क्यामुळे दिवसभर तालुक्यात याच विषयाची चर्चा सुरू होती.

Total Visitor Counter

3341383
Share This Article