GRAMIN SEARCH BANNER

दापोलीच्या किनाऱ्यावर डॉल्फिनची लगबग; पर्यटकांसाठी आकर्षण

Gramin Varta
83 Views

दापोली : कोकणातील ‘मिनी महाबळेश्वर’ म्हणून ओळख असलेल्या दापोली तालुक्यात थंडीची चाहूल लागताच निसर्गाचे रूप अधिकच खुलले आहे. निळ्याशार समुद्राच्या पृष्ठभागावर उड्या मारत मुक्त संचार करणाऱ्या डॉल्फिन माशांनी आंजर्ले किनाऱ्यावर मोठ्या संख्येने हजेरी लावली असून, हे दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. डिसेंबरच्या सुरुवातीलाच तब्बल १० फुटी डॉल्फिन दिसून आल्याने पर्यटकांमध्ये विशेष कुतूहल निर्माण झाले आहे.
डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात दापोली तालुक्यातील किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली गेल्यामुळे समुद्रातील वातावरण डॉल्फिनसाठी पोषक ठरले आहे. परिणामी मुरूड, हर्णै, लाडघर आणि आंजर्ले या किनारपट्ट्यांवर डॉल्फिनचा वावर वाढताना दिसत आहे. ८ ते १० फुटांपर्यंत लांबी असलेले डॉल्फिन वारंवार दर्शन देत असल्याने देश-विदेशातील पर्यटक दापोलीकडे आकर्षित होत आहेत.

कोकण किनारपट्टी ही डॉल्फिनसाठी नैसर्गिक अधिवास मानली जाते. उथळ समुद्रतळ, चिखलयुक्त भाग आणि मासळीची विपुलता यामुळे या सागरी सस्तन प्राण्यांना येथे अनुकूल वातावरण मिळते. ‘इंडियन ओशन हम्पबॅक’ आणि ‘बॉटलनोज’ या प्रजातींचे डॉल्फिन या भागात नेहमीच पाहायला मिळतात.

आंजर्ले किनाऱ्यावर सध्या डॉल्फिन दर्शनासाठी सहा फायबर नौका कार्यरत आहेत. खेळकर स्वभावाचे डॉल्फिन अनेकदा बोटींच्या जवळ येत उड्या मारतात, त्यामुळे पर्यटकांना थरारक अनुभव मिळतो. अलीकडे १० फुटी डॉल्फिनचे दर्शन घडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, यामुळे दापोलीच्या पर्यटनाला नवसंजीवनी मिळाली आहे

Total Visitor Counter

3366863
Share This Article