GRAMIN SEARCH BANNER

ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात शिंदेंचा दणदणीत विजय; धाराशिव नगरपरिषदेत काय घडले? काय म्हणाले राजन साळवी?

Gramin Varta
23 Views

धाराशिव: जिल्ह्यात आठ नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी २ डिसेंबरला निवडणूक झाली होती. याचे निकाल आज जाहीर झाले असून धाराशिवमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसनेनेने कळंब, भूम, परंडा, उमरगा या चार ठिकाणी विजय मिळवला आहे. तसेच भाजपाचे तुळजापूर, नळदुर्ग, मुरूम या तीन ठकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयी झाले आहेरत. धाराशिवमधील नेमकं चित्र काय? काय म्हणाले राजन साळवी? जाणून घेऊयात.

धाराशिवमध्ये शिंदेंचा दणदणीत विजय

धाराशिवमध्ये आठ नगरपालिकांसाठी २ डिसेंबरलाच मतदान पार पडले. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशीच महायुतीत तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. महायुतीमध्ये भाजपा, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्रित निवडणुका लढवतील असे चित्र असताना महायुतीत बिघाडी झाली. तर या निवडणुकीसाठी ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आले होते. या निवडणुकीत धाराशिवमध्ये शिंदेसेनेला चार तर भाजपाला तीन जागांवर यश मिळवले आहे.

काय म्हणाले राजन साळवी?

धाराशिव हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात, मात्र पक्ष फुटीनंतर येथील खासदार आणि आमदार ठाकरेंबरोबर राहिले. त्यामुळे याला प्रामुख्याने ठाकरेंचा बालेकिल्ला म्हणून पाहिले गेले. या विजयावर बोलताना शिंदेसेनेचे संपर्क प्रमुख राजन साळवी म्हणाले की, “धाराशिव हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्यात शिवसेना भाजपा-युती झाली. आजच्या निकालाने चित्र स्पष्ट केले आहे की, आठपैकी चार ठिकाणी शिवसेनेचे नगराध्यक्ष विराजमान झाले आहेत, तीन ठिकाणी भाजपाचे नगराध्यक्ष विराजमान झाले आहेत. याचा अर्थ १०० टक्के यश जनतेने आम्हाला दिले आहे.”

ते पुढे म्हणाले,”महायुती सरकार असल्याने धाराशिव जिल्ह्यात अनेक बदल घडवण्याचे काम केले जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि या जिल्ह्यातील आमचे एकमेव आमदार तानाजी सावंत या सर्व वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज महायुतीचे वर्चस्व पाहायला मिळत आहे.”

ठाकरेंच्या शिवसेनेबाबत बोलताना राजन साळवी म्हणाले, “आज या जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरेंचे आमदार, खासदार आहेत. परंतु, आजच्या निकालामुळे या सर्वांचाच हा पराभव असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भविष्यातसुद्धा म्हणजे येणाऱ्या जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्येसुद्धा महायुतीचा भगवा फडकेल, हा विश्वास आम्हाला आहे.” राजन साळवी हे याच फेब्रुवारी महिन्यात उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले.

Total Visitor Counter

3072146
Share This Article