GRAMIN SEARCH BANNER

डिंगणी–शास्त्री पूल–आंबेड मार्ग धोक्यात

Gramin Varta
14 Views

गॅस पाईपलाईन कामातील बेदरकारपणा नागरिकांच्या जीवावर बेतण्याची भीती

संगमेश्वर : डिंगणी ते शास्त्री पूल–आंबेड या मार्गावर सुरू असलेल्या गॅस पाईपलाईनच्या भूमिगत कामामुळे संपूर्ण परिसर धोक्याच्या छायेत सापडला आहे. कोणतीही सुरक्षितता न बाळगता सुरू असलेली खोदाई, अस्ताव्यस्त मातीचे ढिगारे आणि प्रशासनाचे गूढ मौन यामुळे हा रस्ता अक्षरशः अपघातांचा सापळा ठरत आहे.

कामादरम्यान रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात माती टाकण्यात आल्याने आधीच अरुंद असलेला मार्ग अधिकच संकुचित झाला आहे. त्यामुळे दोन वाहनांना एकमेकांना ओलांडणे अवघड बनले असून, दिवसाढवळ्याही वाहतूक कोंडी, वादावादी आणि किरकोळ अपघात नित्याचे झाले आहेत.

रात्रीचा प्रवास जीवघेणा

रात्रीच्या वेळी परिस्थिती आणखी भयावह होते. कोणतेही बॅरिकेड्स, रेडियम पट्टे, सूचना फलक किंवा प्रकाश व्यवस्था नसल्याने अंधारात हा मार्ग म्हणजे थेट संकटाला आमंत्रण ठरत आहे. अचानक समोर येणारे खड्डे आणि मातीचे ढिगारे वाहनचालकांसाठी जीवावर बेतणारे ठरत असून, “कोणाचा तरी जीव गेल्यावरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.

पर्यटन मार्गावर निष्काळजीपणा
शास्त्री पूल–आंबेड ते गणपतीपुळे हा अत्यंत वर्दळीचा आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा मार्ग आहे. देशभरातून येणारे पर्यटक, स्थानिक वाहतूक आणि अवजड वाहनांची सततची ये-जा असताना, अशा मार्गावर सुरक्षेचा पूर्ण अभाव ठेवून काम सुरू असणे ही गंभीर बाब मानली जात आहे.

परवानगीचा गोंधळ, जबाबदारीला पळवाट

या कामासाठी नेमकी कोणत्या विभागाची परवानगी घेण्यात आली आहे, याबाबत विचारणा केली असता ठेकेदारांकडून समाधानकारक उत्तर मिळत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता एमआयडीसीकडे वर्ग असल्याचे सांगत हात झटकले, तर इतर यंत्रणाही जबाबदारी घेण्यास टाळाटाळ करत आहेत. अपघात झाल्यास जबाबदारी कोणाची, हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे.

भूस्खलनाचा वाढता धोका

रस्त्यालगतच्या डोंगर उतारावर मोठ्या प्रमाणात खोदाई सुरू असल्याने भविष्यात भूस्खलन, झाडे कोसळणे किंवा रस्ता खचण्यासारख्या गंभीर दुर्घटनांचा धोका निर्माण झाला आहे. हे सर्व सुरू असताना संबंधित अधिकारी नेमके कुठे आहेत, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

या कामातील निष्काळजीपणामुळे एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ठेकेदार व संबंधित प्रशासनाचीच असेल, असा थेट इशारा स्थानिक ग्रामस्थ आणि वाहनचालकांनी दिला आहे. या प्रश्नाकडे तातडीने लक्ष न दिल्यास लवकरच जिल्हाधिकारी यांच्याकडे सामूहिक तक्रार दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Total Visitor Counter

3081328
Share This Article