GRAMIN SEARCH BANNER

राजापुरातील संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी ग्रामपंचायतींनी तातडीने प्रस्ताव सादर करावेत : तहसीलदार गंबरे

Gramin Varta
75 Views

राजापूर : तालुक्यात संभाव्य पाणीटंचाईची समस्या उद्भवू नये यासाठी प्रशासनासोबत लोकसहभाग अत्यंत आवश्यक असून तालुका टँकरमुक्त राहावा यासाठी आतापासूनच ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन तहसीलदार विकास गंबरे यांनी केले. संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर येत्या दोन ते तीन दिवसांत संबंधित ग्रामपंचायतींनी पंचायत समितीकडे आवश्यक प्रस्ताव सादर करावेत, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.

जलजीवन मिशन योजनेंतर्गत तालुक्यात सुरू असलेल्या कामांचा आढावा घेताना तहसीलदार गंबरे यांनी स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेऊन ही कामे गतीने व दर्जेदार पूर्ण करण्याचे निर्देश दिले. या बैठकीत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने सुरू असलेल्या नळपाणी योजनांची सद्यस्थिती, कामांतील अडचणी आणि प्रलंबित बाबींबाबत सविस्तर माहिती सादर केली. त्यानंतर या योजनांच्या अंमलबजावणीवर सखोल चर्चा करण्यात आली.

बैठकीस गटविकास अधिकारी तुकाराम जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी निलेश जगताप, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता श्री. पवार यांच्यासह तालुक्यातील सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जलजीवन मिशनची अंमलबजावणी संथ गतीने सुरू असून काही ठिकाणी कामांचा दर्जा निकृष्ट असल्याची नाराजी सरपंच संघटनेचे अध्यक्ष व कोंडीवळेचे सरपंच रविकांत मटकर यांनी व्यक्त केली. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, अधिकारी आणि ग्रामस्थांना विश्वासात घेऊन आराखडे तयार केले असते तर आज संभाव्य पाणीटंचाई आराखडा बैठक घ्यायची वेळ आली नसती, असे त्यांनी सांगितले.

या बैठकीत तालुक्यातील गावनिहाय नळपाणी योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. चुनाकोळवणचे सरपंच श्रीकांत मटकर यांनी जलजीवन मिशनच्या कामकाजाबाबत माहिती देत एप्रिल-मे महिन्यातील तात्पुरत्या उपाययोजनांपेक्षा नळपाणी योजनांची कामे वेळेत पूर्ण करून त्या प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यावर भर देण्याची मागणी केली. रायपाटणचे सरपंच निलेश चांदे यांनी जुन्या नळपाणी योजनांच्या दुरुस्तीसाठी नव्याने प्रस्ताव देताना जमीनमालकांकडून बक्षिसपत्राची अट अडचणीची ठरत असल्याचे निदर्शनास आणले.
या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी चर्चा सुरू असून लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. बैठकीला सौंदळच्या सरपंच मिनल तळवडेकर, गोवळचे सरपंच अभिजीत कांबळे, शिळचे सरपंच अशोक पेडणेकर, ताम्हणेच्या सरपंच समिक्षा वाफेलकर, मिठगावच्या आशा काजवे, विलयेच्या सावली परवडी, शेजवलीचे सरपंच मंदार राणे, पिदावणचे प्रसाद बापट, हातदेचे विश्वनाथ पाटेकर यांच्यासह मोठ्या संख्येने सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित राहून चर्चेत सहभागी झाले आणि विविध सूचना मांडल्या.

Total Visitor Counter

3368889
Share This Article