GRAMIN SEARCH BANNER

‘जलजीवन’च्या ६० टक्के योजना अडचणीत, केंद्राच्या निधीअभावी कामांना ब्रेक; आतापर्यंत ६०८ कोटींचा खर्च

Gramin Varta
52 Views

रत्नागिरी : जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत एकूण १ हजार ४३२ पाणीपुरवठा योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी आतापर्यंत ७७२ योजना पूर्ण झाल्या असून एकूण कामाची प्रगती ४०.०६ टक्के आहे. सध्या ६५० हून अधिक योजनांची कामे ५० टक्क्यांपेक्षा अधिक टप्प्यावर पोहोचली आहेत. या संपूर्ण प्रकल्पावर आतापर्यंत सुमारे ६०८.४६ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील वर्षानुवर्षांची पाणीटंचाई दूर करण्यासाठी जलजीवन मिशन महत्त्वाचा टप्पा ठरत असला, तरी केंद्र शासनाकडून अपेक्षित निधी न मिळाल्याने उर्वरित सुमारे ६० टक्के योजना अडचणीत सापडल्या आहेत.

जलजीवन मिशनअंतर्गत केंद्र व राज्य शासनाने प्रत्येकी ५० टक्के आर्थिक सहभागातून योजना राबवण्याचे धोरण स्वीकारले आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील साडेचार लाखांहून अधिक कुटुंबांना घरगुती नळजोडणीद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत ५५९ गावांना ‘हर घर जल’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या नोंदीनुसार, जिल्ह्यातील एकूण ४ लाख ४८ हजार १६१ कुटुंबांपैकी ३ लाख ७८ हजार १९१ कुटुंबांपर्यंत नळाद्वारे पाणी पोहोचले आहे. २०२६ अखेर ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला सुरक्षित आणि पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्याचा केंद्र शासनाचा संकल्प आहे.

या योजनेअंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे बळकटीकरण, नवीन जलस्रोतांचा शोध, जुन्या पाणीपुरवठा योजनांचे नूतनीकरण व सुधारणा करून थेट घराघरांत नळाद्वारे पाणी पोहोचवण्याचे काम सुरू आहे. केवळ नळजोडणीपुरते मर्यादित न राहता, नियमित आणि पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होईल, याकडेही विशेष लक्ष दिले जात आहे.

Total Visitor Counter

3199521
Share This Article