GRAMIN SEARCH BANNER

खोपोलीतील मंगेश काळोखे हत्या प्रकरणाचा उलगडा; २० लाखांची सुपारी देऊन कॉन्ट्रॅक्ट किलरकडून खून

Gramin Varta
336 Views

रायगड : खोपोली येथील शिंदे शिवसेनेच्या नूतन नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या हत्येचा तपासात मोठा उलगडा झाला असून ही हत्या कॉन्ट्रॅक्ट किलरकडून घडवून आणल्याचे स्पष्ट झाले आहे. हत्येसाठी तब्बल २० लाख रुपयांची सुपारी दिल्याची कबुली मुख्य सूत्रधार रवींद्र देवकर याने दिल्याची माहिती रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिली.

या प्रकरणात पसार असलेले आदिल मुखत्यार शेख आणि खालीद खलिल कुरेशी यांना रायगड पोलिसांनी पुण्यातील वानवडी परिसरातून अटक केली आहे. आतापर्यंत या हत्या प्रकरणात एकूण १२ जणांना अटक करण्यात आली असून आणखी एक संशयित अद्याप फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.

मंगेश काळोखे यांची २६ डिसेंबर रोजी पहाटे पाच जणांनी पाठलाग करून निर्घृणपणे हत्या केली होती. या घटनेने खोपोली शहरासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली होती. हत्येनंतर राजकीय वातावरण तापले असून विविध पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिकाच सुरू झाली होती.

पोलिस तपासात ही हत्या पूर्णपणे पूर्वनियोजित असल्याचे निष्पन्न झाले आहे. मुख्य सूत्रधार रवींद्र देवकर याने इशा पापा शेख हिच्यामार्फत कॉन्ट्रॅक्ट किलरना सुपारी दिली होती. आदिल मुखत्यार शेख, खालीद खलिल कुरेशी आणि अन्य एका संशयिताला मिळून २० लाख रुपये देण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे.

आर्थिक व्यवहार, मोबाईल कॉल डिटेल्स तसेच अटकेतील संशयितांच्या जबाबांच्या आधारे संपूर्ण कट उघडकीस आला आहे. हत्या करण्यापूर्वी अनेक दिवस रेकी करण्यात आली होती आणि योग्य संधी साधून हा हल्ला करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

या प्रकरणात मुख्य सूत्रधार रवींद्र देवकर, त्याचा मुलगा दर्शन देवकर, धनेश रविंद्र देवकर, उर्मिला रविंद्र देवकर, विशाल सुभाष देशमुख, महेश शिवाजी धायतडक, सागर राजू मोरे, सचिन दयानंद खराडे, दिलीप हरिभाऊ पवार यांच्यासह एकूण १२ जणांना अटक करण्यात आली आहे.रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अभिजीत शिवतारे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली या खळबळजनक हत्या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

3367238
Share This Article