GRAMIN SEARCH BANNER

राजापूर सागवेतील कात्रादेवी यात्रोत्सवाला लाखो भाविकांची अलोट गर्दी

Gramin Varta
327 Views

राजापूर : तालुक्यातील सागवे गावात असलेल्या प्रसिध्द श्री कात्रादेवीचा वार्षिक यात्रोत्सव शुक्रवारी भक्तिभावाच्या वातावरणात आणि मोठ्या उत्साहात पार पडला. महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या भाविकांनी कात्रादेवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यात्रोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ग्रामपंचायत सागवे, देवस्थान कमिटी, नाटे पोलीस स्थानक तसेच आरोग्य विभागाने संयुक्तपणे चोख नियोजन केले होते.

यात्रेच्या दिवशी सकाळी देवीची विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली. त्यानंतर ओटी भरण्यासाठी विशेषतः महिलांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती. दुपारी मुख्य मंदिरातून देवीची मिरवणूक वाजत-गाजत यात्रास्थळी नेण्यात आली. मुख्य मंदिरापासून सुमारे एक ते दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या यात्रास्थळी पोहोचल्यानंतर परंपरेनुसार विविध धार्मिक विधी पार पडले आणि मखरामध्ये देवीची स्थापना करण्यात आली.

रात्री देवीला गाऱ्हाणे घालून नारळ अर्पण करण्यात आले. पूजाअर्चेनंतर दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागली होती. सायंकाळी सुरू झालेला हा यात्रोत्सव पहाटेपर्यंत अखंड सुरू होता. यात्रास्थळी राजापूर, कोल्हापूर तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक व्यापाऱ्यांनी विविध वस्तूंची दुकाने थाटली होती. त्यामुळे यात्रेचे स्वरूप भक्तीबरोबरच उत्सवमय झाले होते.

भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच कुंभवडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने वैद्यकीय पथक सज्ज ठेवण्यात आले होते. विविध राजकीय पक्ष व सामाजिक संस्थांकडून मदत केंद्रे, सरबत आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

यात्रेच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत, देवस्थान कमिटी आणि ग्रामस्थांनी व्यापक तयारी केली होती. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी स्वच्छता, रस्त्यांची दुरुस्ती, सुशोभिकरण, वाहतूक व पार्किंगची योग्य व्यवस्था करण्यात आली होती. तसेच व्यावसायिकांसाठी दुकान गाळे व नियोजित जागा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

भाविकांच्या सोयीसाठी राजापूर एस.टी. आगाराकडून अतिरिक्त बसेसचे नियोजन करण्यात आले होते. राजापूरसह देवगड व विजयदुर्ग आगारातूनही बसेस सोडण्यात आल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय टळली. अलोट गर्दी, भक्तिभाव आणि सुव्यवस्थित नियोजनात श्री कात्रादेवीचा यात्रोत्सव यशस्वीरीत्या पार पडला.

Total Visitor Counter

3378265
Share This Article