GRAMIN SEARCH BANNER

दापोली : पाजपंढरी येथे मासे पळवणारा चोरटा रंगेहाथ पकडला

Gramin Varta
159 Views

दापोली: तालुक्यातील पाजपंढरी (पिराजवळ) येथे मच्छीमार महिलांच्या उपजीविकेवर घाला घालणाऱ्या एका संशयित चोराला ग्रामस्थांनी सतर्कता दाखवत रंगेहाथ पकडले आहे. हा प्रकार गुरुवारी रात्री घडला असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून गावातील कष्टकरी महिला रात्रंदिवस मेहनत करून मिळवलेली मासळी पेट्या व बॉक्समध्ये बर्फ टाकून नीटनेटकी पॅकिंग करून रस्त्यांच्या कडेला, चौपाट्यांवर आणि इतर सुरक्षित ठिकाणी ठेवत होत्या. मात्र, आपल्या श्रमावर विश्वास ठेवून ठेवलेली ही महागडी मासळी वारंवार चोरीला जात असल्याच्या घटना समोर येत होत्या. या चोरीच्या सत्रामुळे मच्छीमार महिलांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला होता आणि त्यांना मोठा आर्थिक फटका बसत होता. या पार्श्वभूमीवर, वारंवार होणाऱ्या चोरीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी ग्रामस्थांनी गुरुवारी रात्री सापळा रचला होता आणि त्यामध्ये संशयित मासे चोरताना अलगद तावडीत सापडला.

या घटनेनंतर मच्छी विक्रेत्या महिलांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पोटासाठी आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे काम करतो, त्यामुळे आमच्या श्रमाचे नुकसान करणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी या महिलांनी केली आहे. तसेच ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना संबंधितांकडून नुकसानभरपाई मिळावी, अशी स्पष्ट भूमिकाही मच्छीमार महिलांनी मांडली आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे अखेर या संशयिताला पकडण्यात यश आले असले, तरी या घटनेनंतर संपूर्ण गावात सुरक्षेबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी एकत्रित उपाययोजना करण्याची मागणी आता पाजपंढरी परिसरातून होत आहे.

Total Visitor Counter

3370295
Share This Article