GRAMIN SEARCH BANNER

सावर्डे येथील जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मेहुल कुलकर्णी, तर निबंध स्पर्धेत मुग्धा गोताड प्रथम

Gramin Varta
198 Views

सावर्डे: सह्याद्री शिक्षण संस्थेचे संस्थापक, माजी खासदार आणि शिक्षण महर्षी स्वर्गीय गोविंदरावजी निकम यांच्या जयंती महोत्सवानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धेत मेहुल कुलकर्णी, श्लोक शिंदे आणि मुग्धा गोताड यांनी घवघवीत यश संपादन केले. सह्याद्री शिक्षण संस्थेच्या प्राथमिक शाळा सावर्डेतर्फे गेल्या बारा वर्षांपासून इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. कला व विज्ञान महाविद्यालय सावर्डेच्या सभागृहात नुकत्याच पार पडलेल्या या स्पर्धांचे उद्घाटन सह्याद्री कॉम्पिटेटीव्ह अकॅडमीचे अध्यक्ष अनिरुद्ध निकम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर चिपळूण पंचायत समितीच्या माजी सभापती पूजा निकम, प्राचार्य तानाजी कांबळे, प्राचार्य राजेंद्र वारे, माजी सरपंच शौकत माखजनकर, मीरा जोशी व शकील मोडक आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी ‘घरात हवेत आजी-आजोबा’ आणि ‘सोशल मीडियाचे समाजावर होणारे परिणाम’ हे विषय देण्यात आले होते. या स्पर्धेत सह्याद्री प्राथमिक शाळा सावर्डेच्या मेहुल मंगेश कुलकर्णी याने प्रथम क्रमांक पटकावून पाच हजार रुपये रोख, चषक व प्रमाणपत्र मिळवले. प्राथमिक शाळा खेर्डी-चिंचघरी-सतीचा विद्यार्थी दुर्वांक अविनाश शिंदे याने द्वितीय, तर आर. सी. काळे प्राथमिक विद्यालय पेढे-परशुरामची विद्यार्थिनी साईशा कमलेश वांद्रे हिने तृतीय क्रमांक मिळवला. खेडच्या रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलचा प्रभास कदम आणि ज्ञानेश्वर विद्यामंदिर लांजाचा मैत्रेय आजगावकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

निबंध स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा कासे नं. २ ची मुग्धा रोहित गोताड हिने प्रथम क्रमांक मिळवत पाच हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले. जिल्हा परिषद शाळा नारदखेरकी नं. २ चा ईशान अभय गोखले याने द्वितीय, तर जिल्हा परिषद शाळा आंबव पोंक्षेची स्वरा मंगेश शिगवण हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. कोकरे नं. १ च्या प्रांजल प्रकाश बुदर हिला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. विशेष म्हणजे, सर्वोत्कृष्ट निबंध लेखनासाठी श्लोक सूरज शिंदे यास आमदार शेखर निकम यांच्याकडून पाच हजार रुपयांचे विशेष पारितोषिक घोषित करण्यात आले आहे.

या स्पर्धांचे परीक्षण भानुदास देसाई व शिल्पा राजेशिर्के यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शकील मोडक यांच्यासह प्राथमिक शाळेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. या स्पर्धेचा शानदार बक्षीस वितरण समारंभ शनिवार, १७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९:३० वाजता स्वर्गीय गोविंदरावजी निकम यांच्या स्मारकस्थळी संपन्न होणार आहे.

Total Visitor Counter

3274437
Share This Article