GRAMIN SEARCH BANNER

सावर्डे येथे १६ व १७ जानेवारीला स्व. गोविंदरावजी निकम जयंती महोत्सवाचा जागर; यजुर्वेद महाजन आणि गार्गी फुले थत्ते यांची प्रमुख उपस्थिती

Gramin Varta
41 Views

सावर्डे : सह्याद्री शिक्षण संस्थेचे संस्थापक आणि माजी खासदार स्व. गोविंदरावजी निकम साहेब यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त येत्या १६ आणि १७ जानेवारी २०२६ रोजी सावर्डे येथील ‘स्मृतिगंध’ या स्मारकस्थळी भव्य जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने दोन दिवस विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांची मेजवानी रत्नागिरीकरांना मिळणार असून युवा पिढीला दिशा देणाऱ्या नामवंत वक्त्यांची उपस्थिती हे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.

महोत्सवाचा शानदार शुभारंभ १६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता होणार असून, यावेळी दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष यजुर्वेद महाजन आणि प्रसिद्ध अभिनेत्री गार्गी फुले थत्ते हे उपस्थित राहून युवकांशी संवाद साधणार आहेत. यजुर्वेद महाजन यांनी शिक्षण क्षेत्रात मोठे कार्य केले असून ‘मनोबल’ प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी हजारो विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवले आहे. ‘अभ्यास मित्र’ आणि ‘पालक मित्र’ या भूमिकेतून त्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना नवी उमेद देणारे ठरेल. तसेच ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांचा वारसा समर्थपणे चालवणाऱ्या गार्गी फुले थत्ते या चित्रपट व नाट्य क्षेत्रातील आपल्या अनुभवातून युवकांना प्रेरणा देणार आहेत.

या दोन दिवसीय सोहळ्याची सुरुवात १६ जानेवारीला सकाळी ८:३० वाजता ‘भक्तीसंगम सह्याद्री कलामंच’ प्रस्तुत ‘गीतांजली’ या सुश्राव्य कार्यक्रमाने होईल. त्यानंतर दुपारी ३ वाजता कोल्हापूरचे लोकशाहीर रणजीत आशा अंबाजी यांचा ‘फक्त बसा आणि मनसोक्त हसा’ हा मनोरंजनाचा कार्यक्रम रंगणार आहे. सायंकाळी ७ वाजता सह्याद्री परिवार कर्मचारी वृंद भजन संध्येचे सादरीकरण करतील. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच १७ जानेवारीला सकाळी ९:३० वाजता विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ पार पडणार असून, यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसिद्ध अभिनेते प्रभाकर मोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता ‘सह्याद्री बालकलाविष्कार’ आणि दुपारी २ वाजता ‘सह्याद्री युवा कलाविष्कार’ या कार्यक्रमांतून स्थानिक विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे.

सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न होत असून, संस्थेचे सर्व विश्वस्त, शिक्षक, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी या महोत्सवाच्या नियोजनासाठी विशेष परिश्रम घेत आहेत. स्व. गोविंदरावजी निकम साहेबांनी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात दिलेले योगदान आणि त्यांचा राष्ट्रहिताचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प या महोत्सवाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. या ९१ व्या जयंती महोत्सवात चिपळूण-संगमेश्वर परिसरातील नागरिक, पालक आणि विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे सचिव महेश महाडिक व महोत्सव आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Total Visitor Counter

3199481
Share This Article