लांजा : तालुक्यातील विलवडे रेल्वेस्टेशन वरून व्हेळ फाटा ते पाचल रस्त्यावर रविवारी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास एक वृद्ध आजी व तीन अल्पवयीन मुले संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आली. स्थानिकांनी चौकशी केली असता ही मुले मुंबईतील चेंबूर येथून घरातील कोणालाही न सांगता निघून आल्याची माहिती मिळाली. विलवडे रेल्वे स्थानकावर उतरून मूर, ता. राजापूर येथे जायचे असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, त्यांना घरचा पत्ता अथवा संपर्क क्रमांक सांगता येत नव्हता.
या घटनेची माहिती तात्काळ मूर गावचे पोलीस पाटील श्री. सुर्वे यांना देण्यात आली. त्यांनी संबंधित आजी व मुले आपल्या गावातीलच असल्याची खात्री केली. याचवेळी परिसरात पेट्रोलिंगवर असलेले बीट अंमलदार श्री. आखाडे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी त्वरित घटनास्थळी दाखल होत आवश्यक कार्यवाही केली.
यानंतर व्हेळ गावातील रिक्षा चालक श्री. संतोष पडिलकर यांच्या रिक्षातून आजी व तीनही मुलांना मूर, ता. राजापूर येथील त्यांच्या घरी सुरक्षितपणे पोहोचवण्यात आले. त्या ठिकाणी पोलीस पाटील श्री. सुर्वे तसेच मुलांचे नातेवाईक उपस्थित होते. संबंधित आजी या बोलू न शकणाऱ्या असल्याची माहिती समोर आली आहे.
वेळीच दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठी अनर्थ टळली असून मोगरगावचे पोलीस पाटील अमोल पळसुळे देसाई, ग्रामस्थ राजू शिगम, माहिती देणारे संतोष दत्ताराम कदम तसेच स्थानिक नागरिकांचे सहकार्य लाभल्याने ही कार्यवाही यशस्वी ठरली.
मुंबई चेंबूर येथून घरातून निघालेली अल्पवयीन मुले लांजात फिरताना आढळली, ग्रामस्थांच्या मदतीने सुखरूप कुटुंबीयांच्या स्वाधीन






