मुंबई : आंगणेवाडी यात्रेनिमित्त मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. कोकण रेल्वेवरील नियमित रेल्वेगाड्यातील अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी, मध्य आणि कोकण रेल्वेद्वारे चार विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.यामुळे यात्रेकरूंचा प्रवास सोयीस्कर होईल.
कोकणातील प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या आंगणेवाडीची जत्रा महाराष्ट्रासह देश-विदेशातल्या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. दरवर्षी आंगणेवाडीच्या जत्रेत लाखो भाविक उपस्थिती लावत असतात.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथे श्री भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव ९ फेब्रुवारी रोजी होणार आहे. दरवर्षी आंगणेवाडीच्या जत्रेनिमित्त लाखो भाविक तेथे जातात. मुंबईतील बहुसंख्य कोकणवासीय मोठ्या संख्येने आंगणेवाडीच्या जत्रेला दाखल होतात. त्यामुळे भाविकांच्या सोयीसाठी मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावर विशेष रेल्वेगाडी धावणार आहे.
भाविकांचा प्रवास योग्यरित्या होण्यासाठी, प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी कोकण रेल्वेने चार विशेष रेल्वेगाड्या चालवण्याची घोषणा केली. गाडी क्रमांक ०११२७ / ०११२८ लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक टर्मिनस, गाडी क्रमांक ०१००३ / ०१००४ लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस या चार विशेष रेल्वेगाड्या धावतील.
कोकण रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेच्या समन्वयाने लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी रोड विशेष रेल्वेगाडी चालवण्याचे नियोजन केले आहे. गाडी क्रमांक ०११२७ लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी रोड विशेष रेल्वेगाडी ७ फेब्रुवारी रोजी रात्री १०.१५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल. ही रेल्वेगाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल. गाडी क्रमांक ०११२८ सावंतवाडी रोड ते लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष रेल्वेगाडी ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.२० वाजता सावंतवाडी रोड येथून सुटेल.
तर दुसऱ्या दिवशी पहाटे ४.०५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या रेल्वेगाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकांवर थांबतील. या रेल्वेगाडीला एकूण २२ डबे एलएचबी असतील. वातानुकूलित द्वितीय श्रेणीचा एक डबा, वातानुकूलित तृतीय श्रेणीचे ६ डबे, शयनयान ९ डबे, सामान्य ४ डबे, एसएलआर एक डबा, जनरेटर कार एक डबा अशी रेल्वेगाडीची संरचना असेल.
गाडी क्रमांक ०१००३ लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव साप्ताहिक विशेष गाडी ८ फेब्रुवारी आणि १० फेब्रुवारी रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी ७.५५ वाजता सुटेल. ही गाडी त्याच दिवशी रात्री १० वाजता मडगाव जंक्शन येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१००४ मडगाव जंक्शन – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष गाडी ७ फेब्रुवारी आणि ९ फेब्रुवारी रोजी मडगाव जंक्शन येथून दुपारी ४.३० वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे ५:५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या रेल्वेगाडीला करमळी, थिवि, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलावडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे स्थानकांवर थांबतील. या रेल्वेगाडीला एकूण २२ डबे असतील. शयनयानचे २० डबे आणि एसएलआर २ डबे असतील. या रेल्वेगाडीचे सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर या रेल्वेगाडीचे आरक्षण सुरू आहे, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली.
आंगणेवाडी यात्रेसाठी कोकण रेल्वेवरून विशेष रेल्वेगाड्या







