GRAMIN SEARCH BANNER

सरकारी कार्यक्रमांमध्ये, शाळांमध्ये राष्ट्रगीतानंतर आता संपूर्ण ‘वंदे मातरम्’ वाजवणे अनिवार्य

Gramin Varta
66 Views

नवी दिल्ली: केंद्र सरकारने ‘वंदे मातरम्’ संदर्भात बुधवारी सकाळी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. नव्या निर्देशांनुसार, आता सरकारी कार्यक्रमांमध्ये, शाळांमध्ये आणि अनेक महत्त्वाच्या सोहळ्यांमध्ये ‘वंदे मातरम्’ वाजवणे अनिवार्य असेल.

राष्ट्रगीत ‘जन गण मन’प्रमाणेच सर्वांनी उभे राहून त्याचा सन्मान करणे बंधनकारक असेल. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या गीताचे संपूर्ण सहा कडवे वाजवले जाणार आहेत. यांपैकी चार कडवी 1937 मध्ये काँग्रेसने वगळली होती. स्वातंत्र्यलढ्यातील या गीताला त्याच्या मूळ स्वरूपात आणि ताकदीसह पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देण्याचा हा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या नव्या नियमांनुसार ‘वंदे मातरम्’ राष्ट्रगीतानंतर लगेच वाजवले जाईल. म्हणजे आधी ‘जन गण मन’ आणि त्यानंतर ‘वंदे मातरम्’. हा नियम सर्व सरकारी कार्यक्रमांमध्ये आणि शाळांमध्ये लागू असेल. मात्र चित्रपटगृहांमध्ये चित्रपटादरम्यान हा नियम लागू होणार नाही. ‘वंदे मातरम्’ आता पद्म पुरस्कारांसारख्या नागरी सन्मान सोहळ्यांमध्येही वाजवले जाईल. राष्ट्रपतींच्या कोणत्याही कार्यक्रमात त्यांच्या आगमन आणि प्रस्थानाच्या वेळी हे गीत वाजवणे आवश्यक असेल. तसेच राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांच्या आगमन-प्रस्थानाच्या वेळी, त्यांच्या भाषणापूर्वी आणि नंतरही हा नियम लागू राहील. तिरंगा फडकावण्याच्या प्रसंगीही याचे पालन केले जाईल. गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की हे गीत वाजवले किंवा गायले जात असताना उपस्थित सर्वांनी सावधान मुद्रेत उभे राहावे.

1875 मध्ये बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी ‘वंदे मातरम्’ लिहिले, जे 1882 मध्ये त्यांच्या ‘आनंदमठ’ या कादंबरीत प्रकाशित झाले. या गीतात एकूण सहा कडवी आहेत. प्रारंभीची कडवी भारतमातेचे वर्णन करतात. पुढील कडव्यांमध्ये दुर्गा, कमला (लक्ष्मी) आणि सरस्वती या हिंदू देवतांचा उल्लेख आहे. 1937 मध्ये काँग्रेसने फैजपूर अधिवेशनात केवळ पहिली दोन कडवी स्वीकारली होती, कारण काही मुस्लिम सदस्यांनी देवतांच्या उल्लेखावर आक्षेप घेतला होता. आता सरकारने संपूर्ण सहा कडवी वाजवण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यांचा कालावधी सुमारे 3 मिनिटे 10 सेकंद इतका आहे.

Total Visitor Counter

3199300
Share This Article