मुंबई-गोवा महामार्गाचे काम ९६ टक्के पूर्ण; कोकणवासीयांचा प्रवास आता सुसाट होणार

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

रत्नागिरी (प्रतिनिधी): गेल्या अनेक वर्षांपासून कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याचा आणि संयमाचा विषय ठरलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम आता खऱ्या अर्थाने अंतिम टप्प्यात पोहोचले असून ‘मिशन ९६ टक्के’ फत्ते झाले आहे. महामार्गाच्या एकूण २५९.५१३ किलोमीटर लांबीच्या अंतरापैकी तब्बल २४९.७३२ किलोमीटरचे चौपदरीकरण पूर्ण झाले असून आता केवळ ९.७८१ किलोमीटरचे काम शिल्लक राहिले असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाने दिली आहे. ९६.२३ टक्के महामार्ग वाहतुकीसाठी सज्ज झाल्याने मुंबई ते गोवा असा प्रवास आता विनासायास आणि सुसाट वेगाने होण्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

राष्ट्रीय महामार्ग विभागाने दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, या महामार्गाचे अनेक टप्पे आता पूर्णपणे वाहतूकक्षम झाले आहेत. यामध्ये तळेगाव ते काळमठ आणि झाराप ते पत्रादेवी या भागातील काम १०० टक्के पूर्ण झाले असून काळमठ ते झाराप आणि वाकेड ते तळेगाव दरम्यानचे कामही ९९.९९ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. अत्यंत खडतर समजल्या जाणाऱ्या परशुराम घाट ते आरवली या ३४.४५ किलोमीटरच्या पट्ट्यात ९७.४० टक्के काम पूर्ण झाले असून येथे केवळ किरकोळ तांत्रिक कामे शिल्लक आहेत. महामार्गाचा सर्वाधिक शिल्लक राहिलेला हिस्सा आरवली ते कांटे आणि कांटे ते वाकेड या दोन पॅकेजेसमध्ये असून तिथेही कामाची प्रगती वेगाने सुरू आहे.
आरवली ते कांटे दरम्यान अद्याप सुमारे अडीच किलोमीटरचा रस्ता तयार होणे बाकी असून तिथे ८५.०५ टक्के प्रगती झाली आहे.

दुसरीकडे, कांटे ते वाकेड या ४९.१५ किलोमीटरच्या टप्प्यात ९१.१८८ टक्के काम पूर्ण झाले असून सुमारे ५ किलोमीटरच्या कामाची प्रतीक्षा आहे. हे दोन टप्पे पूर्ण होताच महामार्गाचा अखंड चौपदरी पट्टा प्रवाशांसाठी उपलब्ध होईल. परशुराम घाटापासून ते झारापपर्यंतचा मोठा हिस्सा आता सुरक्षित झाला असून घाटातील कामे मार्गी लागल्याने प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार आहे. शिल्लक राहिलेले अवघे ९ किलोमीटरचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून या वर्षअखेरीस कोकणवासीयांचा वनवास संपण्याची शक्यता आहे. महामार्गाच्या या यशामुळे कोकणातील पर्यटन आणि स्थानिक उद्योगांनाही मोठी चालना मिळणार असून राष्ट्रीय महामार्ग विभागाने या कामात मोठी भरारी घेतल्याचे मानले जात आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *