रत्नागिरीत आता मरणही महागलं; अंत्यसंस्काराच्या दरात नगर परिषदेकडून दुप्पट वाढ

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

रत्नागिरी (प्रतिनिधी): महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या रत्नागिरीकरांना आता मृत्यू नंतरही मोठे आर्थिक चटके सोसावे लागणार आहेत. रत्नागिरी नगर परिषदेच्या गुरुवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत अंत्यसंस्काराच्या दरात मोठी वाढ करण्याचा निर्णय सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकमताने मंजूर केला आहे. नगर परिषदेची तिजोरी सावरण्यासाठी घेतलेल्या या निर्णयामुळे आता सामान्यांच्या खिशाला मोठी कात्री बसणार असून, गरिबांना आपल्या हक्काच्या निरोपासाठीही किमान ५ ते ६ हजार रुपयांची वेगळी तरतूद करून ठेवावी लागणार अशी विदारक स्थिती निर्माण झाली आहे.

या नव्या ‘रेटकार्ड’नुसार नगर परिषदेने शहरासह शहराबाहेरील मृतदेहांसाठी वेगवेगळे दर निश्चित केले आहेत. स्मशानभूमीतील लाकडांसाठी शहरांतर्गत रहिवाशांना पूर्वी १,००० रुपये आकारले जात होते, त्यात वाढ करून तो दर आता १,५०० रुपये करण्यात आला आहे. शहराबाहेरील मृतदेहांसाठी पूर्वीचा २,००० रुपयांचा दर आता थेट २,५०० रुपयांवर पोहोचला आहे. लाकडांशिवाय गॅस शवदाहिनीच्या दरातही मोठी वाढ करण्यात आली असून शहर परिसरासाठी हा दर ५०० रुपयांवरून १,००० रुपये, तर शहराबाहेरील मृतांसाठी १,००० रुपयांवरून २,००० रुपये इतका करण्यात आला आहे. शहरात अंत्यविधीसाठी वर्षाला सुमारे ३५ लाख रुपये खर्च होत असल्याचे कारण देत प्रशासनाने ही दरवाढ लादली आहे.

विशेष म्हणजे या दरवाढीला सत्ताधारी आणि विरोधी अशा सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी एकमताने मंजुरी दिली. नगर परिषदेची आर्थिक स्थिती सावरण्यासाठी केवळ स्मशानभूमीच नव्हे, तर मालमत्ता करावर २ टक्के अतिरिक्त अग्निशमन आणि दिवाबत्ती कर लावण्यावरही या सभेत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. महागाईने आधीच कंबरडे मोडलेले असताना, आता अंत्यसंस्काराचे दरही वाढवल्याने रत्नागिरीकरांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या जगण्यासोबतच मरणही महाग झाले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *