GRAMIN SEARCH BANNER

लोटे एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट; पोलीस अधीक्षकांनी रुग्णालयात जाऊन केली जखमी कामगारांची विचारपूस

खेड : तालुक्यातील लोटे एमआयडीसीमधील डॉक्टर खान केमिकल कंपनीत शुक्रवारी दुपारी रिएक्टरचा भीषण स्फोट होऊन १० कामगार गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षक यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली, तसेच रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमी कामगारांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. लोटे एमआयडीसीतील या कंपनीत दुपारच्या सत्रात काम सुरू असताना अचानक रिएक्टरचा स्फोट झाला, ज्यामध्ये १० कामगार होरपळले असून त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. स्फोटानंतर कंपनी परिसरात मोठी धावपळ उडाली होती, मात्र अग्निशमन दल आणि पोलिसांनी तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. सर्व जखमींना तात्काळ नजीकच्या परशुराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, तिथे त्यांच्यावर युद्धपातळीवर उपचार सुरू आहेत. पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षक यांनी स्वतः रुग्णालयात जाऊन जखमींच्या उपचाराबाबत डॉक्टरांशी चर्चा केली आणि कामगारांना धीर दिला. हा स्फोट नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास पोलीस आणि संबंधित विभागाकडून केला जात आहे.

Total Visitor Counter

3485608
Share This Article