रत्नागिरी:रत्नागिरी जिल्ह्यात अवैध वृक्षतोड आणि लाकडांची बेकायदेशीर वाहतूक रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली असून, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई केली आहे. या कारवाईत विनापरवाना खैराच्या लाकडांची वाहतूक करणारी दोन वाहने पकडण्यात आली असून, एकूण ११,७१,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याभरात नियमित गस्त आणि तपासणी मोहीम राबवली जात आहे.
या मोहिमेअंतर्गत ८ मार्च २०२६ च्या आधी म्हणजेच ७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५:१० वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक मौजे निवळी बावनदी परिसरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी संशयास्पद वाटणाऱ्या वाहनांची तपासणी केली असता, बोलेरो पिकअप (क्रमांक MH-14-HG-7338) आणि टाटा योद्धा (क्रमांक MH-08-AP-4339) या दोन गाड्यांमध्ये खैराच्या जातीच्या झाडांची लहान-मोठी अशी एकूण १८१ नग लाकडे विनापरवाना आढळून आली. या प्रकरणी पोलिसांनी अजित गंगाराम चव्हाण (वय २६, रा. आंबडस, खेड), अरबाज हमीद सुर्वे (वय ३४, रा. घाणेखुंट, खेड) आणि अक्षय राजू चव्हाण (वय २८, रा. भिंगळोली, मंडणगड) या तिघांना ताब्यात घेतले आहे.
हे आरोपी खैराची झाडे कोठून तरी तोडून त्याची चोरी करून बेकायदेशीर रित्या वाहतूक करत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या तिन्ही आरोपींविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ आणि भारतीय वन अधिनियम १९२७ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली प्रशांत बोरकर, सुभाष भागणे, नितीन डोमणे, भैरवनाथ सवाईराम आणि अतुल कांबळे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. या घटनेचा पुढील तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस करत आहेत.






