लांजा:तालुक्यातील गवाणे चव्हाणवाडी येथे घराबाहेर निघून गेलेल्या एका ५५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह विहिरीत सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अनंत तुकाराम चव्हाण (वय ५५, रा. गवाणे चव्हाणवाडी) असे मयत व्यक्तीचे नाव असून, ही दुर्दैवी घटना होळीच्या मांडाजवळील एका विहिरीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अनंत चव्हाण यांचे मानसिक संतुलन बिघडलेले असल्याने १२ मार्च २०२६ रोजी रात्री ८:०० वाजण्याच्या सुमारास ते राहत्या घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेले होते. बराच वेळ झाला तरी ते घरी न परतल्याने नातेवाईकांनी त्यांची सर्वत्र शोधमोहीम सुरू केली होती. १३ मार्च रोजी सकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास त्यांचा शोध घेत असताना, वाडीतील होळीच्या मांडा शेजारी असलेल्या अर्चना चव्हाण यांच्या मालकीच्या विहिरीच्या पाण्यात त्यांचा मृतदेह तरंगताना मिळून आला.या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांना पाचारण केले.
लांजा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह विहिरीबाहेर काढला आणि उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. याप्रकरणी १३ मार्च रोजी दुपारी २:०८ वाजता बी.एन.एस.एस. १९४ प्रमाणे आमू. क्रमांक १४/२०२६ नुसार लांजा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. राहत्या घरातून अचानक निघून गेलेल्या अनंत चव्हाण यांचा अशा प्रकारे विहिरीत मृतदेह सापडल्याने चव्हाणवाडीवर शोककळा पसरली आहे.







