GRAMIN SEARCH BANNER

दापोली: बायकोने चहा उशिरा दिल्याच्या रागातून कुकरने मारहाण, पतीविरुद्ध गुन्हा

Gramin Varta
187 Views

दापोली : चहा आणि नाश्ता बनवण्यासारख्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाल्याची धक्कादायक घटना दापोली येथील नॅशनल हायस्कूल जवळ असलेल्या असिया प्लाझा येथे घडली आहे. चहा आणि पाव फ्राय उशिरा का दिला, या रागातून पतीने आपल्या पत्नीला हाताने व कुकरन पाठीवर मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी पीडित पत्नी असमा मुनिफ खलपे (वय ३४) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती मुनिफ अब्दुलगनी खलपे याच्याविरुद्ध दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, १० मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी असमा खलपे या घरात काम करत असताना, त्यांचे पती मुनिफ यांनी त्यांना चहा आणि पाव फ्राय करून मागितला. असमा यांनी चहा आणि नाश्ता दिल्यानंतर, ‘पाव फ्राय उशिरा का दिला’ असे म्हणून मुनिफ यांनी त्यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर रागाच्या भरात मुनिफ यांनी किचनमधील कुकर उचलून असमा यांच्या पाठीवर तीन-चार वेळा जोरात प्रहार केले. या मारहाणीत त्यांच्या पाठीवर मुका मार लागून गंभीर दुखापत झाली आहे. घटनेनंतर असमा यांनी उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे वैद्यकीय तपासणी करून १२ मार्च रोजी पोलीस ठाण्यात धाव घेतली. आपल्या पतीचा स्वभाव रागीट असून तो नेहमी विनाकारण त्रास देतो, असेही त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा नोंदवला असून हेड कॉन्स्टेबल अशोक गायकवाड या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3172851
Share This Article