नाटे येथे मासेमारी नौकेवरील खलाशाचा चक्कर येऊन मृत्यू

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

रत्नागिरी: नाटे येथील मुसाकाजी जेटीवरून मासेमारीसाठी गेलेल्या एका नौकेवरील खलाशाचा अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रामलाल फुलराम थारू (वय ४७ वर्षे, मूळ रा. टिकापूर, जि. कैलाली, नेपाळ) असे मृत पावलेल्या खलाशाचे नाव असून, ही घटना आंबोळगड समुद्र परिसरात मासेमारी सुरू असताना घडली. याप्रकरणी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अहवालावरून नाटे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १८ एप्रिल २०२६ रोजी पहाटे ४:०० वाजण्याच्या सुमारास बक्तीयार अब्दुल लतीफ सोमेस्कर यांची ‘अब्दुल लतीफ’ नावाची मच्छिमारी नौका नाटे येथील मुसाकाजी जेटीवरून समुद्रात रवाना झाली होती. या नौकेवर रामलाल थारू यांच्यासह १७ नेपाळी खलाशी आणि अन्य दोन कर्मचारी कामावर होते. सकाळी ८:४५ वाजण्याच्या सुमारास ही बोट आंबोळगड बंदराजवळ मासेमारी करत असताना रामलाल थारू यांना अचानक चक्कर आली आणि ते बोटीवरच बेशुद्ध पडले. सहकारी खलाशी देश प्रकाश चौधरी याने तात्काळ बोटीच्या मालकाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर तातडीने ही नौका नाटे जेटीवर परत आणण्यात आली.

जेटीवर बोट पोहोचल्यानंतर सकाळी ११:०० वाजता रुग्णवाहिकेच्या मदतीने रामलाल यांना उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुपारी १२:५० वाजण्याच्या सुमारास येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सिव्हील हॉस्पिटल येथे धाव घेऊन पंचनामा केला. २० एप्रिल रोजी सायंकाळी या प्रकरणाची अधिकृत नोंद बी.एन.एस.एस. १९४ प्रमाणे करण्यात आली आहे. भरसमुद्रात अचानक प्रकृती बिघडल्याने एका कष्टकरी खलाशाचा मृत्यू झाल्याने नाटे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, नाटे पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *