चिपळूण: तालुक्यातील गांग्रई मोहल्ला येथे किरकोळ कारणावरून एका ६० वर्षीय वृद्धावर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात अकबर मोहिद्दीन मुल्लाजी (वय ६०, रा. गांग्रई मोहल्ला) हे गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी संशयित आरोपी फैजल महंमद निवसेकर याच्याविरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १३ मार्च रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास फिर्यादी अकबर मुल्लाजी हे आपल्या घरी पायी चालत जात होते. ते गांग्रई मोहल्ला स्टॉपवर आले असता, त्याच मोहल्ल्यात राहणारा संशयित फैजल निवसेकर हा आपल्या मोटरसायकलवरून त्या ठिकाणी आला.
त्याने हातातील लाकडी दांडक्याने अकबर मुल्लाजी यांच्या डोक्यावर, डाव्या हाताच्या मनगटावर तसेच बरगडी आणि पायाच्या मांडीवर जोरदार प्रहार करून त्यांना गंभीर दुखापत केली. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून जखमी वृद्धाने १४ मार्च रोजी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ११८(१), ११७(२), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास चिपळूण पोलीस करत असून या हल्ल्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.







