GRAMIN SEARCH BANNER

खेड पोलिसांची थरारक कामगिरी: २० वर्षांपूर्वीच्या वृद्धेच्या खुनातील फरार आरोपींना अखेर बेड्या

Gramin Varta
188 Views

खेड: ‘कायद्याचे हात लांब असतात’ याचा प्रत्यय देणारी एक मोठी कारवाई खेड पोलिसांनी नुकतीच केली आहे. तालुक्यातील सवणस येथील वरचा मोहल्ला येथे १३ एप्रिल २००६ रोजी आबिदा मियाँसाहेब सुर्वे या वृद्ध महिलेची गळा चिरून अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला होता. तेव्हापासून फरार असलेले जहूर अब्दुल रज्जाक सुर्वे ऊर्फ राजू गजानन तांबे आणि गुफरान अब्दुल रज्जाक सुर्वे ऊर्फ संदीप गजानन तांबे या दोन मुख्य आरोपींना तब्बल २० वर्षांनंतर गजाआड करण्यात खेड पोलिसांना यश आले आहे.

​या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, मृत आबिदा सुर्वे यांनी २००५ मध्ये या आरोपींविरुद्ध घरफोडीची तक्रार दाखल केली होती. याच रागातून आरोपींनी वृद्ध महिला घरी एकटी असल्याचे पाहून त्यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करून त्यांची हत्या केली आणि ते फरार झाले. या गुन्ह्यात फातिमा इसाक सुर्वे यांनी फिर्याद दिल्यानंतर तत्कालीन पोलीस निरीक्षक डी. ओ. जाधव यांनी काही महिला आरोपींना ताब्यात घेतले होते, मात्र पुराव्याअभावी त्यांची न्यायालयातून निर्दोष मुक्तता झाली होती. मुख्य आरोपी मात्र नाव आणि वेष बदलून पनवेल परिसरातील रसायनी आणि नांदगाव येथे वास्तव्य करत असल्याने पोलिसांच्या हाती लागत नव्हते. आपल्याला कोणीही ओळखू शकणार नाही, या भ्रमात असलेल्या या आरोपींना वाटले होते की हा गुन्हा आता पचला आहे.

​मात्र, पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांना हे आरोपी वेष बदलून गावात आल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यांनी तातडीने सहकाऱ्यांसह सापळा रचला आणि या दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. सुरुवातीला चौकशीत उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या या आरोपींनी कसून तपास केल्यावर आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी पुरवणी दोषारोप पत्रासह आरोपींना आज न्यायालयात हजर केले आहे. दोन दशकांनंतरही गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना जेरबंद केल्याबद्दल खेड पोलिसांच्या जिद्दीचे आणि कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Total Visitor Counter

3367836
Share This Article