GRAMIN SEARCH BANNER

राजापूरचे अमृत तांबडे यांना २०२६ चा “महाराष्ट्र भूषण – रत्नशास्त्र” पुरस्कार

Gramin Varta
295 Views

राजापूर : राजापूरचे रत्नशास्त्र अभ्यासक अमृत तांबडे यांना २०२६ सालचा प्रतिष्ठेचा “महाराष्ट्र भूषण – रत्नशास्त्र” पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार पुण्यातील शिवाजीनगर येथे १४ मार्च २०२६ रोजी आयोजित भव्य समारंभात देण्यात आला. आनंदी युनिव्हर्स फाऊंडेशनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक आणि कलावंत यांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमात प्रसिद्ध सिने अभिनेत्री नेहा पतिले आणि सिने अभिनेत्री मुग्धा ठाकूर यांच्या हस्ते श्री.अमृत तांबडे यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि शाल-श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. रत्नशास्त्र क्षेत्रात त्यांनी केलेल्या संशोधनकार्यामुळे आणि नव्या प्रकारची रत्ने शोधून काढण्याच्या प्रयत्नांमुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

अमृत तांबडे हे रत्नशास्त्र या विषयावर दीर्घकाळ अभ्यास आणि प्रयोग करत आहेत. त्यांच्या “अमृत जेम्स” या कंपनीमार्फत विविध प्रकारची मौल्यवान व अर्ध-मौल्यवान रत्ने शोधणे, त्यांचा अभ्यास करणे तसेच त्यांचे संवर्धन आणि व्यावसायिक वापर यावर काम केले जाते. त्यांनी आतापर्यंत अनेक नवीन प्रकारची रत्ने शोधून त्यांचे गुणधर्म अभ्यासले आहेत. रत्नांच्या गुणवत्तेचा, ऊर्जा गुणधर्मांचा आणि त्यांच्या विविध उपयोगांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.

पुरस्कार स्वीकृतीनंतर बोलताना अमृत तांबडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “हा सन्मान माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. रत्नशास्त्राच्या क्षेत्रात अजूनही खूप संशोधन करण्याची गरज आहे. पुढील काळात मी आणखी नवीन रत्ने शोधून त्यावर अभ्यास करणार आहे,” असे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी लवकरच काही नव्या प्रकारची रत्ने बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा मानसही व्यक्त केला.

या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी अमृत तांबडे यांच्या कार्याचे कौतुक केले. रत्नशास्त्रासारख्या विशेष क्षेत्रात संशोधन करून नवीन संधी निर्माण करणारे त्यांचे कार्य तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याचे वक्त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले. अमृत तांबडे यांना मिळालेल्या या सन्मानामुळे राजापूरसह संपूर्ण कोकण परिसरात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे. रत्नशास्त्र क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्यामुळे भविष्यात या क्षेत्राला नवी दिशा मिळेल, असा विश्वासही उपस्थितांनी व्यक्त केला.

Total Visitor Counter

3353995
Share This Article