GRAMIN SEARCH BANNER

सावर्डे पोलिसांची धडाकेबाज कारवाई; आगवे बौद्धवाडीतून दोन बंदुकांसह जिवंत काडतुसे जप्त, एकाला बेड्या!

Gramin Varta
569 Views

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्रे बाळगणे, त्यांची वाहतूक आणि वापराविरुद्ध जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली कडक मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने चिपळूण तालुक्यातील आगवे येथे छापा टाकून दोन बंदुका आणि नऊ जिवंत काडतुसांसह एका आरोपीला रंगेहाथ अटक केली आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखालील पथक १८ मार्च २०२६ रोजी सावर्डे पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना, आगवे येथील महेश जाधव हा इसम घराच्या मागे अवैध दारू विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून पाहणी केली असता, घरामागील गुरांच्या गोठ्याजवळ एका लाकडी खोपटीत एक इसम बंदुकीची साफसफाई करताना आढळून आला. पोलिसांनी महेश महेंद्र जाधव (वय ३५, रा. आगवे बौद्धवाडी) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याच्याकडे एक सिंगल बॅरल काडतुसाची बंदूक, एक जुनी नादुरुस्त ठासणीची बंदूक आणि नऊ जिवंत काडतुसे असा एकूण ७० हजार ९०० रुपये किमतीचा मुद्देमाल विनापरवाना मिळून आला.

याप्रकरणी पोलिसांनी सर्व साहित्य पंचांसमक्ष जप्त केले असून, आरोपी विरुद्ध सावर्डे पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या यशस्वी कारवाईत पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्यासह पोलीस अंमलदार विजय आंबेकर, दिपराज पाटील, विवेक रसाळ आणि अतुल कांबळे यांचा सहभाग होता. 

Total Visitor Counter

3366871
Share This Article