रत्नागिरी: निसर्गाचा चमत्कार मानला जाणारा आणि अत्यंत दुर्मिळ असलेला काळा बिबट्या विहिरीत पडल्याची खळबळजनक घटना नुकतीच रत्नागिरीत समोर आली असून, तब्बल ३६ तासांच्या अथक संघर्षानंतर वनविभागाने या बिबट्याला जीवदान दिले आहे. शिकारीचा पाठलाग करत असताना अंधारामुळे विहिरीचा अंदाज न आल्याने हा बिबट्या खोल विहिरीत कोसळला होता. विहिरीत पाणी असल्याने आणि बाहेर पडण्यासाठी कोणताही आधार नसल्याने या वन्यजीवाचा जीव टांगणीला लागला होता. मात्र, विहिरीच्या कडेला असलेल्या एका अरुंद जागेचा आधार घेत या बिबट्याने स्वतःला मृत्यूच्या दाढेतून वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले, मात्र बिबट्या प्रचंड घाबरलेला आणि आक्रमक असल्याने त्याला बाहेर काढणे हे रेस्क्यू टीमसमोर मोठे आव्हान होते.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत चपळाईने आणि नियोजित पद्धतीने बचाव कार्य राबवले. बिबट्याला कोणतीही इजा होऊ नये यासाठी विहिरीत खास बनावटीचा पिंजरा सोडण्यात आला होता. बिबट्याला पिंजऱ्यापर्यंत पोहोचता यावे यासाठी लाकडी ओंडके आणि शिडीचा कल्पकतेने वापर करून एक तात्पुरता मार्ग तयार करण्यात आला. तब्बल ३६ तास अत्यंत संयमाने बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवल्यानंतर, अखेर भुकेलेला आणि थकलेला बिबट्या सुरक्षिततेच्या शोधात पिंजऱ्यात शिरला आणि बचाव पथकाने तत्काळ पिंजरा वर ओढून ही मोहीम यशस्वी केली.
विहिरीतून बाहेर काढल्यानंतर वनविभागाच्या डॉक्टरांनी या दुर्मिळ बिबट्याची सखोल वैद्यकीय तपासणी केली. सुदैवाने, इतका प्रदीर्घ काळ विहिरीत राहूनही त्याला कोणतीही गंभीर इजा झाली नसल्याचे स्पष्ट झाले. काही काळ निरीक्षणाखाली ठेवल्यानंतर, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार या काळया बिबट्याला पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात म्हणजेच जंगलात सुरक्षितपणे मुक्त करण्यात आले आहे. या मोहिमेबद्दल बोलताना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याचे आभार मानले असून, दुर्मिळ वन्यजीवाचा जीव वाचवल्याबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून वनविभागाच्या या धाडसी कामगिरीचे कौतुक होत आहे.






