GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीच्या शीतल पिंजरे यांची अखिल भारतीय पोलीस अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत चमक; रौप्य पदकावर कोरले नाव

Gramin Varta
139 Views

रत्नागिरी: जालंधर, पंजाब येथे आयोजित करण्यात आलेल्या ७४ व्या अखिल भारतीय पोलीस अ‍ॅथलेटिक्स क्लस्टर स्पर्धा २०२५-२६ मध्ये रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने देशपातळीवर आपला दबदबा निर्माण केला आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील महिला पोलीस शिपाई शीतल संभाजी पिंजरे यांनी अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करत रौप्य पदक पटकावले आहे. त्यांच्या या उत्तुंग यशामुळे केवळ रत्नागिरी पोलीस दलाचीच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे.

पंजाबमधील जालंधर येथे पार पडलेल्या या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशभरातील विविध राज्यांतील पोलीस दलांचे खेळाडू सहभागी झाले होते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत शीतल पिंजरे यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर द्वितीय क्रमांक पटकावून रौप्य पदकावर नाव कोरले. त्यांच्या या यशाची दखल घेत रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या हस्ते शीतल पिंजरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले व त्यांच्या पुढील क्रीडा कारकीर्दीसाठी आणि वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शीतल पिंजरे यांचे कौतुक केले असून, त्यांच्या या कामगिरीमुळे पोलीस दलातील इतर खेळाडूंनाही प्रेरणा मिळणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

Total Visitor Counter

3388226
Share This Article