GRAMIN SEARCH BANNER

राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्याकडून विश्वविक्रमी रांगोळी कलाकार विलास रहाटे यांचे कौतुक

Gramin Varta
96 Views

मुंबई: बिहार राज्य स्थापना दिनाचे औचित्य साधून राजभवन येथील लोकभवन येथे साकारण्यात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण रांगोळीचे महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी विशेष कौतुक केले. देवरुखचे सुपुत्र आणि मुंबई विद्यापीठाचे कला मार्गदर्शक असलेले विश्वविक्रमी रांगोळी कलाकार श्री. विलास विजय रहाटे यांनी ही कलाकृती साकारली होती. राज्यपाल महोदयांनी रहाटे यांच्याशी अत्यंत आपुलकीने संवाद साधत रांगोळी कलेतील बारकावे आणि त्यांनी साकारलेल्या विषयाचा आशय समजून घेतला. रहाटे यांच्या या कलेवर प्रसन्न होऊन राज्यपालांनी त्यांची पाठ थोपटून त्यांना शाबासकी दिली.

विलास रहाटे यांनी या रांगोळीच्या माध्यमातून बिहारच्या समृद्ध वारशाचे दर्शन घडवले होते. यामध्ये बिहारचा नकाशा, तेथील धार्मिक वारसा सांगणारी बुद्ध मंदिरे, ऐतिहासिक वैभव दर्शवणारा शेरशाह सुरीचा मकबरा, सांस्कृतिक परंपरेतील छटपूजा आणि निसर्गाशी नाते सांगणारी गंगा नदी अशा विविध पैलूंचे अत्यंत जिवंत चित्रण करण्यात आले होते. या सोहळ्याला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, संयुक्त सचिव श्री. एस. राममुर्थी आणि प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

विलास रहाटे यांना मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील आणि सांस्कृतिक समन्वयक निलेश सावे यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभत आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही महाराष्ट्राचे माजी राज्यपाल तथा विद्यमान उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी रहाटे यांच्या कलेचा गौरव केला होता. तसेच माजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि रमेश बैस यांच्या कार्यकाळातही रहाटे यांनी आपल्या पोर्ट्रेट रांगोळीच्या माध्यमातून राजभवनात आपली नाममुद्रा उमटवली आहे. कोकणच्या या सुपुत्राने आपल्या कलेच्या माध्यमातून पुन्हा एकदा राजभवन आणि मुंबई विद्यापीठाची मान उंचावली आहे.

Total Visitor Counter

3376930
Share This Article