GRAMIN SEARCH BANNER

धक्कादायक : मंडणगडात दोन वेगवेगळ्या घटनांत दोन पंप हाऊस फोडून इलेक्ट्रीक पंप लांबवले

Gramin Varta
80 Views

टोळक्याला अटक

मंडणगड: तालुक्यातील शिरगाव परिसरात चोरट्यांच्या एकाच टोळीने उच्छाद मांडला असून, एकाच रात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी करत नळपाणी पुरवठा योजनेचे इलेक्ट्रीक पंप चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

शिरगाव गोमुख आणि शिरगाव धर्मा या दोन ठिकाणी झालेल्या या धाडसी चोऱ्यांमुळे परिसरात खळबळ उडाली असून, या दोन्ही घटनांमध्ये रायगड आणि सातारा जिल्ह्यातील त्याच चार संशयित आरोपींविरुद्ध मंडणगड पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पहिली चोरी २५ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ ते रात्री ११.५० च्या दरम्यान शिरगाव गोमुख येथे घडली. येथील पंप हाऊसच्या दरवाजाच्या खालच्या बाजूच्या फळ्या कोणत्यातरी अवजाराने उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि १० हजार रुपये किमतीचा ५ एचपी क्षमतेचा पाण्याचा पंप चोरून नेला. याप्रकरणी पंपचालक सुनील मधुकर पाटील (वय ४६) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. या घटनेचा तपास सुरू असतानाच शिरगाव धर्मा येथील पंप हाऊसमध्येही चोरी झाल्याचे समोर आले. येथील सिमेंटचा दरवाजा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करत २० हजार रुपये किमतीचा १२ एचपीचा दुरुस्त केलेला पाण्याचा पंप लंपास केला. याप्रकरणी शेतकरी आत्माराम तुकाराम जोधळे (वय ६२) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

या दोन्ही गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी सिकंदर रमेश कनोजिया (वय ३०), मोहित रमेश कनोजिया (वय २१, दोन्ही रा. महाड, मुळ रा. उत्तर प्रदेश) तसेच आकाश प्रकाश पवार (वय २५) आणि अविनाश दीपक जाधव (वय २४, दोन्ही रा. आकले, जि. सातारा) या चौघांना संशयित आरोपी म्हणून निष्पन्न केले आहे. पोलिसांनी या टोळीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५ (अ), ३३१(३) आणि ३३१(४) अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर २८/२०२६ आणि २९/२०२६ नुसार नोंद केली आहे. एकाच टोळीने शिरगाव परिसरात धुमाकूळ घातल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून, मंडणगड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3377660
Share This Article