GRAMIN SEARCH BANNER

खळबळजनक: देऊड कसबेवाडीत  किराणा दुकानासमोर अघोरी विधीचा प्रकार

Gramin Varta
439 Views

प्राण्याची कवटी ठेऊन जादूटोण्याचा प्रकार

रत्नागिरी: तालुक्यातील देवुड कसबेवाडी येथे एका किराणा दुकानासमोर अज्ञात व्यक्तीने नरबळीसदृश अघोरी विधी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या अघोरी कृत्यामुळे परिसरात मोठी दहशत पसरली असून, रत्नागिरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी सुनील शांताराम गोताड (वय ४६, रा. देवुड कसबेवाडी) यांचे गावातीलच मेसर्स लक्ष्मी स्टोअर्स नावाचे किराणा मालाचे दुकान आहे. दि. २८ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास फिर्यादी गोताड हे नेहमीप्रमाणे आपल्या दुकानात गेले असता, त्यांना दुकानासमोरील एका काजूच्या झाडाखाली काहीतरी अघोरी प्रकार घडल्याचे निदर्शनास आले.
कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे नुकसान व्हावे, या वाईट उद्देशाने दुकानासमोरील मोकळ्या जागेत झाडाखाली केळीच्या पानावर एक लिंबू, एक नारळ आणि एका कोणत्यातरी प्राण्याची जुनाट, लहान आकाराची कवटी मांडून अघोरी विधी केल्याचे दिसून आले. या साहित्याकडे पाहून तेथे कोणीतरी जादूटोणा किंवा तांत्रिक पूजा केल्याचे स्पष्ट होत होते.

या अघोरी प्रकारामुळे फिर्यादी सुनील गोताड आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, परिसरातही उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. हा प्रकार दि. २७ मार्च रोजी रात्री ८ वाजल्यापासून ते दि. २८ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान घडल्याचा अंदाज आहे.

या अघोरी कृत्याबाबत सुनील गोताड यांनी रत्नागिरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दि. २९ मार्च रोजी पहाटे २.१५ वाजता अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ च्या कलमांसह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध अधिनियम २०१३ च्या कलम ३(२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

अमानुष, अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार (मंजुरी कायदा) गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. रत्नागिरीसारख्या शांत जिल्ह्यात असा नरबळीसदृश अघोरी विधीचा प्रकार समोर आल्याने सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. पोलीस अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत.

Total Visitor Counter

3388910
Share This Article