GRAMIN SEARCH BANNER

लोटे एमआयडीसीत पीफास उत्पादनाविरोधात ६ एप्रिलला धडकणार भव्य मोर्चा

इटलीतील महिलाही सहभागी होणार

खेड: लोटे एमआयडीसीतील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीत होणाऱ्या पीफास (PFAS) या घातक रसायनाच्या उत्पादनाविरोधात आता स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, येत्या ६ एप्रिल रोजी एका भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. कोकण नागरी संघर्ष समिती, लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण समिती आणि स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने काढण्यात येणाऱ्या या शांततामय मोर्चाला पोलीस प्रशासनाने तोंडी परवानगी दिली आहे. या आंदोलनाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये इटली येथील एका महिलेचाही सहभाग असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, यामुळे या लढ्याला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्व प्राप्त झाले आहे.

लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीत पीफास रसायनाचे उत्पादन सुरू झाल्यामुळे परिसरातील हवा, पाणी आणि जमिनीवर त्याचे अत्यंत विपरित परिणाम होतील, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत. हे रसायन मानवी आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी अत्यंत घातक असल्याचे सांगत, हे उत्पादन तातडीने थांबवावे अशी प्रमुख मागणी या मोर्चाद्वारे केली जाणार आहे. याशिवाय, प्रदूषणाची सखोल वैज्ञानिक चौकशी करून अहवाल जाहीर करावा, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि स्थानिक जनतेचे मत जाणून घेण्यासाठी तातडीने जनसुनावणी घ्यावी, अशा मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात येणार आहे. “आपण येणार – मोर्चा यशस्वी करणार” अशी हाक देत आयोजकांनी शेतकरी, कष्टकरी, महिला आणि तरुणांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले असून, पोलीस प्रशासनानेही खबरदारीचा उपाय म्हणून चोख बंदोबस्त ठेवण्याची तयारी दर्शवली आहे. आगामी पिढ्यांच्या आरोग्य रक्षणासाठी पुकारलेल्या या लढ्याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Total Visitor Counter

3486972
Share This Article