GRAMIN SEARCH BANNER

खतांच्या दरवाढीने शेतकरी चिंतेत; खरीप हंगामापूर्वी वाढले आर्थिक ओझे

मुंबई: जागतिक परिस्थिती आणि कच्च्या मालाच्या आयात धोरणातील बदलांचा परिणाम खतांच्या किमतीवर होत असून, अचानक झालेल्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे.

१ एप्रिलपासून विविध खतांच्या दरात १०० ते ३०० रुपयांपर्यंत वाढ झाल्याने खरीप हंगामाच्या तयारीवर थेट परिणाम होत आहे.

अवकाळी पावसामुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी ही दरवाढ आणखी एक मोठा फटका ठरत आहे.

अमरावतीतील स्थानिक बाजारात फेरफटका मारल्यानंतर मिश्र खतांच्या दरात वाढ झाल्याचे स्पष्टपणे दिसून आले. उत्पादन खर्च वाढत असताना शेतीमालाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण अधिकच वाढली आहे.कृषी तज्ज्ञांच्या मते, जागतिक बाजारात कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने खतांचे दर वाढले आहेत. मात्र, या परिस्थितीत शासनाने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, पालांदूर परिसरातील शेतकऱ्यांनी खतांच्या दरवाढीवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, शासनाने अनुदान वाढवावे अशी मागणी केली आहे. खरीप हंगाम तोंडावर असताना झालेल्या या दरवाढीमुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून खतांच्या किमतीत वाढ झाली असली तरी, कोणत्या कंपनीने नेमकी किती दरवाढ केली याबाबत अद्याप अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. सध्या युरिया खत जुन्याच दरात उपलब्ध असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

दरम्यान, खतांच्या ‘लिंकिंग’ पद्धतीमुळेही शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचे समोर आले आहे. गरज नसलेल्या दुय्यम खतांची खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. या मुद्द्यावर लोकप्रतिनिधींमार्फत शासनाचे लक्ष वेधण्यात आले असले तरी अद्याप ठोस निर्णय झालेला नाही.

Total Visitor Counter

3473723
Share This Article