GRAMIN SEARCH BANNER

पावसमध्ये बँकेने सीलबंद केलेले घर फोडून अतिक्रमण; कर्जदारासह तिघांविरुद्ध पूर्णगड पोलिसांत गुन्हा दाखल

Gramin Varta
8 Views

रत्नागिरी:  तालुक्यातील पावस येथे स्वामी स्वरूपानंद मंदिराजवळ बँकेने कायदेशीर प्रक्रियेद्वारे सीलबंद केलेले घर फोडून त्यामध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश करत अतिक्रमण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पूर्णगड पोलीस ठाण्यात कर्जदार दिनेश भरत बाणे (४०), भरत महादेव बाणे (६९) आणि एका ६५ वर्षीय महिलेविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे अधिकारी लक्ष्मण गणू म्हात्रे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दिनेश बाणे यांनी व्यवसायासाठी बँकेकडून २० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते, ज्यासाठी त्यांनी पावस येथील राहते घर (क्र. १२३८) तारण ठेवले होते. कर्जाची परतफेड न केल्यामुळे बँकेने मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार आणि पोलीस संरक्षणात २९ मार्च २०२६ रोजी कोर्ट कमिशनर यांनी या मिळकतीचा ताबा घेऊन घर सीलबंद केले होते. मात्र, २९ मार्च ते ७ एप्रिल या कालावधीत आरोपींनी संगनमताने घराच्या मुख्य दरवाजाचे सीलबंद कुलूप तोडून खिडकी उघडली, तसेच मागील बाजूच्या संडासचेही कुलूप तोडून टाकले. एवढेच नव्हे तर, बँकेच्या ताब्यात असलेल्या या मालमत्तेत भांडी ठेवून आणि अंगणात कपडे वाळत घालून पुन्हा अतिक्रमण केले.

या गंभीर प्रकारानंतर पूर्णगड पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३२९(४), ३२४(२), ६२ आणि ३(५) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक २१/२०२६ नुसार नोंद केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3278528
Share This Article