GRAMIN SEARCH BANNER

खेड: शिरगाव येथे बैलांच्या झुंजीत धक्का लागल्याने धरणात पडून महिलेचा मृत्यू

खेड:  तालुक्यातील शिरगाव पिंपळवाडी लघुपाटबंधारे धरण परिसरात बैलांच्या झुंजीत धक्का लागल्याने पाण्यात पडून एका ५० वर्षीय महिलेचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघातात दिपाली दिलीप ढनळे (वय ५०, रा. खोपी कुपरेवाडी, ता. खेड) या महिलेला आपले प्राण गमवावे लागले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ७ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सव्वा एक वाजेच्या सुमारास दिपाली ढनळे या पुतण्या संतोष कृष्णा ढवळे यांची दोन मुले आणि गुरांना घेऊन पाणी पाजण्यासाठी शिरगाव पिंपळवाडी लघुपाटबंधारे धरणाजवळ गेल्या होत्या.

यावेळी अचानक दोन बैलांमध्ये झुंज सुरू झाली. या झुंजीदरम्यान एका बैलाचा जोरदार धक्का दिपाली यांना लागला आणि त्या अनपेक्षितपणे धरणाच्या खोल पाण्यात पडल्या. पाण्याचा अंदाज न आल्याने त्या पाण्यात बुडाल्या आणि त्यांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात सायंकाळी १६.५० वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये आमू. क्रमांक २०/२०२६ नुसार पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. भरदुपारी घडलेल्या या विचित्र आणि अनपेक्षित अपघातामुळे खोपी कुपरेवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.

Total Visitor Counter

3485607
Share This Article