देवरुख:जिद्द आणि अपार कष्टाच्या जोरावर माणूस शून्यातून विश्व निर्माण करू शकतो, याचे जिवंत उदाहरण रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा घाटातील एका तरुणाने जगासमोर ठेवले आहे. आंबा घाटातील अतिदुर्गम दख्खन धनगर वाडी पूर्व येथील मंगेश सोमा फोंडे याने गरिबीच्या बेड्या तोडून चक्क महाराष्ट्र पोलीस दलात प्रवेश मिळवला आहे. विशेष म्हणजे, ज्या वस्तीत आजही विजेचा पत्ता नाही, तिथून येत मंगेशने एनटीसी प्रवर्गातून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावत यशाचे शिखर गाठले आहे.
मंगेशचा हा प्रवास एखाद्या चित्रपटाला शोभेल असाच संघर्षाचा आहे. जंगलातील घरात राहणाऱ्या मंगेशने आपल्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी कोणापुढे हात पसरले नाहीत. त्याऐवजी त्याने आंबा घाटातील निसर्गाची मदत घेतली. रानावनातून करवंदे गोळा करणे, ती कुड्याच्या पानात बांधून महामार्गावर विकणे आणि हंगामात जांभळे विकून मिळणाऱ्या पैशातून त्याने स्वतःचे शिक्षण पूर्ण केले. केवळ फळेच नव्हे, तर घाटातील एका छोट्या टपरीत आंबा, फणस आणि कणसे भाजून विकण्याचे कष्टप्रद कामही त्याने तितक्याच प्रामाणिकपणे केले. आई-वडील शेती आणि पशुपालन करून घराचा गाडा ओढत असताना मंगेशने त्यांनाही आर्थिक हातभार लावला.
आपले प्राथमिक शिक्षण दख्खनमध्ये आणि माध्यमिक शिक्षण साखरपा येथील वसतिगृहात राहून महात्मा गांधी विद्यालयात पूर्ण करणाऱ्या मंगेशने परिस्थितीपुढे झुकण्यास नकार दिला.
सोयीसुविधांचा अभाव असूनही केवळ पोलीस होण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्याने कठोर सराव सुरू ठेवला. त्याच्या या जिद्दीला अखेर यश आले असून, आंबा घाटाच्या वळणावळणावर कधीकाळी करवंदे विकणारा हा मुलगा आज पोलीस दलात दाखल झाला आहे. मंगेशच्या या देदीप्यमान कामगिरीबद्दल जिल्हभरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, प्रतिकूल परिस्थितीत स्वप्न पाहणाऱ्या ग्रामीण युवकांसाठी तो एक मोठा प्रेरणास्थान ठरला आहे.






